![]()
तालुक्यातील मौजे कोपरा आणि मौजे अहमदपुरच्या सीमेवरील गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला एका क्लिष्ट पाणंद रस्त्याचा वाद संपुष्टात आला आहे. मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे व महसूल प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यातून योग्य मार्ग निघाला. सध्या रस्त्याचे बांधकाम सुरु असून परंपरागत रस्ता मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या गतीमान कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत. राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मातोश्री पाणंद रस्ते योजने’अंतर्गत मोर्शी तालुक्यात गेल्या वर्षभरात अनेक शेतांना हक्काचे रस्ते मिळाले आहेत. आगामी पावसाळ्यात या रस्त्यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, मौजे कोपरा व मौजे अहमदपूर या दोन्हीच्या सीमेवर असलेल्या एका पाणंद रस्त्याचा वाद गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित होता. सीमेवर एकाच शेतकऱ्याची दोन्ही मौजांमध्ये शेती असल्याने त्याने एका ठिकाणी पाणंद रस्ता अडवून काम बंद पाडले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या पावसाळ्यात त्या परिसरातील शेतकऱ्यांना बरेच हाल भोगावे लागले. सदर प्रकरणी आता सर्व वाद निपटवून रस्त्याचे काम युद्ध स्तरावर सुरू झाल्याने येणाऱ्या पावसाळ्यात आपल्याला रस्त्याची अडचण जाणवनार नाही, यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग आनंदी झाला असून, त्यांनी येथील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रामुख्याने तहसीलदारांचे आभार मानले आहेत.
Source link
महसुलच्या धडक कारवाईने रस्त्याचा वाद आला संपुष्टात:मोर्शी तालुक्यातील कोपरा-अहमदपूर काम युद्धपातळीवर