![]()
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर बंगल्यावरील खर्चावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. महापौर बंगल्याच्या दुरुस्ती आणि वाहन खरेदीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी “महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का?” असा सवाल उपस्थित केला. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “माझ्या दोन्ही बाजूला मुंबईचे माजी महापौर आहेत. त्यांनीही एवढा खर्च केला नसेल. एका आमदाराला संपूर्ण मतदारसंघासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो, तर महापौरांच्या बंगल्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्याशिवाय दीड ते दोन कोटी रुपयांच्या गाड्या घेतल्या जात आहेत. हा सर्व खर्च स्वतःवर कशासाठी? महापौर बंगला पर्यटनस्थळ करायचा आहे का, की ताजमहाल उभारायचा आहे?” मुंबईतील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप मुंबईतील स्वच्छता, कचरा, रस्ते आणि बेस्ट सेवेचे प्रश्न कायम असताना प्रशासन महापौर बंगल्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “महापौरांकडे गाड्या खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, पण चौपाटी स्वच्छ करण्यासाठी पैसे नाहीत का? मुंबईत सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे वाढत आहेत. बेस्टच्या बस कमी होत आहेत, कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वेळेवर मिळत नाहीत. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणानंतरही खड्डे कायम आहेत. मात्र महापौर बंगल्यासाठी आणि नव्या गाड्यांसाठी निधी सहज उपलब्ध होतो,” अशी टीका त्यांनी केली. काँक्रीटीकरणावरून सरकारवर हल्लाबोल मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांवरही आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. “दोन वर्षांत मुंबईचे रस्ते चकाचक होतील, असे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले होते. आता चार वर्षे झाली, पण रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाहीत. खिशे भरले गेले, मात्र खड्डे भरले नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाचे कौतुक कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला. “अभिजीत दिपके यांनी कोणतेही राजकारण न करता देशातील तरुणांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. त्या आंदोलनाचा आम्हाला अभिमान आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले. सिद्धिविनायक प्रकरणावर प्रत्युत्तर सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “चोरीप्रकरणी पकडलेले लोक शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. पण मग आधी चंदा चोरीपासून सुरुवात करा. वाराणसीसह इतर मंदिरांमध्ये काय घडले, याचाही आढावा घ्या,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “कोणाचे किती फ्लॅट आहेत, कुठे आहेत, कोणाकडे किती चाव्या आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे. गरज पडल्यास ती जाहीर करू,” असा इशाराही त्यांनी दिला. निवासी डॉक्टरांच्या आंदोलनावर सरकारला धारेवर निवासी डॉक्टरांच्या आंदोलनावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. “डॉक्टरांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. स्टायपेंड, वसतिगृह, सहायक प्राध्यापकांचे वय यांसारखे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. दुसरीकडे नीट परीक्षेतील पेपरफुटीनंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार होतो, पण सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांना तत्काळ जामीन मिळतो. ही दुटप्पी भूमिका आहे,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. हेही वाचा.. अभिजीत दिपके म्हणाले- CJP सध्या राजकीय पक्ष बनणार नाही:दबावगटासारखे काम करू; देशाला नवा पक्ष नव्हे, मजबूत जनआंदोलनाची गरज! नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवर यशस्वी आंदोलन उभारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडत आहे. या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशातील सद्य राजकीय आणि न्याय व्यवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तसेच, देशातील विविध संस्थांची ‘अकाउंटेबिलिटी’ (उत्तरदायित्व) आणि ‘निष्पक्षता’ परत आणण्यासाठी देशव्यापी जनआंदोलनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का?:मुंबई महापौरांवर आदित्य ठाकरेंची टीका, सिद्धिविनायक प्रकरणावरही साधला निशाणा