Headlines

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात उत्साहात:शाळा, महाविद्यालयासह स्वयंसेवी संस्था, संघटनांचा सहभाग‎



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह जिल्हाभरात उत्साह, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारे विविध कार्यक्रम मोठ्या जल्लोषात झाले.

.

शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्षांची कार्यालये, सामाजिक संघटना, सार्वजनिक ठिकाणी अभिवादन, विचारप्रबोधन, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रॅली, भाषणे, वकृत्व स्पर्धा, गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला, तर अनेक ठिकाणी प्रतिमापूजन करुन अभिवादन केले . समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून समता, बंधुता आणि न्याय या त्यांच्या विचारांना पुन्हा उजाळा दिला. या जयंती उत्सवाने केवळ स्मरण नाही, तर त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा संदेशही समाजात दृढ केला.

तिवसा | प्रतिनिधी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ग्रामगीतेचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दापोरी खुर्द येथे आयोजित व्याख्यान सोहळा झाला. “महामानवांचे विचार आणि आधुनिक भारत’ यावर आयोजित या व्याख्यानातून उपस्थितांना वैचारिक मेजवानी मिळाली. स्थानिक मारोती देवस्थान चौक, दापोरी खुर्द येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध व्याख्याते व प्रमुख वक्ते आयुष पवार व उपस्थित प्रतिष्ठीत नागरिक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या वेळी गावातील नुकत्याच शासकिय सेवेत रुजू झालेल्या वैष्णवी खटे व प्रिया वावरे या तरुणींचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख व्याख्याते आयुष पवार यांनी तिन्ही महामानवांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “महात्मा फुलेंनी शिक्षणाची दारे उघडली, डॉ. आंबेडकरांनी त्या शिक्षणाला हक्काची आणि कायद्याची जोड दिली, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासाच्या माध्यमातून त्या विचारांना घराघरात पोहोचवले. या व्याख्यान मालेसाठी नागरिक, विद्यार्थी आणि महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महात्मा फुले जयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्यच्या सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार जान्हवी प्र.सुरोसे यांनी मानले.. सामूहिक राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *