![]()
अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांची स्थिती सध्या अत्यंत भयावह झाली असून, पादचाऱ्यांसाठी असलेले फुटपाथ बहुतांश ठिकाणांहून पूर्णपणे गायब झाले आहेत. अनेक व्यावसायिक आस्थापनांनी महामार्गालगत अनधिकृत बांधकामे केल्याने पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे
.
विशेषतः तारकपूर परिसरात खासगी रुग्णालयांचे जाळे आहे. यातील बहुतांश रुग्णालयांकडे स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध असतानाही, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आपली वाहने महामार्गावरच उभी करत आहेत. हॉटेल्ससमोरही हीच परिस्थिती असून, चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे लावली जात आहेत. ऐन गर्दीच्या वेळी या पार्किंगमुळे महामार्गाचा रस्ता अरुंद होतो आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
उड्डाणपुलाखालील मोकळी जागा आता पार्किंगचा अड्डा बनली आहे. प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा फायदा बेशिस्त वाहनचालक घेत आहेत. महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांना या उभ्या गाड्यांमुळे अडथळा निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढली आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास हा प्रश्न शहराच्या वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरणार आहे.
दंडात्मक कारवाईचा अभाव नो पार्किंग क्षेत्रात तासनतास गाड्या उभ्या असतानाही वाहतूक पोलिसांच्या क्रेन अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांवर कारवाई करण्यात दंग आहे. केवळ दंडाची पावती फाडून प्रश्न सुटणार नाही, तर गाड्या टोईंग करून कठोर कारवाई करण्याची भीती निर्माण होणे गरजेचे आहे. तारकपूर परिसरात महामार्गाच्या कडेला उभी केलेली वाहने कारवाईचा धाकच नाही शहरातील मुख्य रस्ते आणि फुटपाथवर अतिक्रमण वाढत असताना महापालिका अतिक्रमण विभाग आणि पोलीस प्रशासन गप्प आहे. मोजके दिवस मोहिम राबवली की पुढच्या काही दिवसांत त्याच रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणे होतात. प्रशासनाने अशा परिसराचा वारंवार आढावा घ्यायला हवा.
ठोस मोहीम राबवा
शहरातील बहुतांश फुटपाथवर दुकाने थाटली आहेत आणि रस्त्यावर गाड्या लागल्या आहेत. मग आम्ही पायी चालायचे कुठून? सामान्यांच्या हक्काचे फुटपाथ मोकळे करण्यासाठी ठोस मोहीम कधी राबवली जाणार की केवळ कागदी घोडे नाचवले जाणार? प्रशासनाने यावर त्वरित कायमस्वरूपी तोडगा काढावा. – जयंत येलूलकर, ज्येष्ठ नागरिक.