![]()
देशसेवा, स्वच्छता, सुरक्षितता, सजगता आणि भ्रष्टाचारमुक्त समाजकारण हीच स्वातंत्र्याची मूलतत्त्वे आहेत, असे प्रतिपादन सटाण्याच्या नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त सटाणा नगरपरिषद कार्यालय तसेच श्री देवमामलेदार स्मारक परिसरातील महात्मा गांधी चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले. हुतात्मा चौकातील ध्वजारोहण उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्योत्तर ८० वर्षांत प्रथमच ध्वजारोहण सोहळ्यात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समावेश करण्यात आला. नगराध्यक्षा पाटील यांच्या संकल्पनेतून नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ नैसर्गिक तिरंगी फुलांपासून भारताचा नकाशा साकारण्यात आला होता. तसेच तिरंगा चित्ररथ तयार करून देशभक्तीपर गीतांच्या गजरात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, हुतात्मा स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाळकृष्ण भुतेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री देवमामलेदार स्मारकाजवळ ध्वजारोहण करून शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी जिजामाता गर्ल्स हायस्कूल तसेच स्व. पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमास शिवसेना गटनेते राहुल पाटील, भाजप गटनेते चेतन रौंदळ, श्री देवमामलेदार गटनेते मनीषा पवार, सभापती भूषण सोनवणे, चेतन मोरे, कल्पना दयाराम सोनवणे, मुल्ला रऊफ खलील शाह, उपसभापती तनुजा नांद्रे यांच्यासह नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक, मुख्याधिकारी ज्योती भगत, सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
Source link
तिरंगी फुलांनी साकारला भारताचा नकाशा:सटाण्यात ‘वंदे मातरम्’च्या गजरात स्वातंत्र्य दिन साजरा; चित्ररथासह शाेभायात्रा