![]()
कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांच्या जीवितासाठी गंभीर धोका ठरत आहे. या जनावरांमुळे दोन निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी काळे यांनी मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तीव्र चिंता व्यक्त करत ‘आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार?’ असा उद्विग्न सवाल केला. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न गांभीर्याने हाताळून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यांवर ठाण मांडून बसणारी जनावरे, अचानक वाहनांसमोर येणारे कळप आणि वाहतुकीला होणारा अडथळा यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येमुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती घडूच नये यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत,’ असे आमदार काळे यांनी स्पष्ट केले. मोकाट जनावरांचा प्रश्न काही दिवसांपुरता न सोडवता त्यावर ठोस व कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातील संवेदनशील ठिकाणे, प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि शैक्षणिक परिसरात विशेष लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी मुख्याधिकारी अजित निकत यांना दिल्या. ‘तात्पुरता बंदोबस्त नको; कायमस्वरूपी तोडगा हवा!’ दोन नागरिकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्यानंतर मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील प्रमुख रस्ते व गर्दीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबरोबरच भविष्यात हा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिल्या.
Source link
‘आता सबब नको, कारवाई हवी!’:मोकाट जनावरांप्रश्नी आ. काळेंचा प्रशासनाला इशारा, नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले; कायमस्वरूपी उपाययोजनांच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना