Headlines

महिलांनी अन्यायाविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज:सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांचे प्रतिपादन




महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत मात्र अनेक वेळा महिला तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत. मात्र आता महिलांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध पुढे येऊन तक्रार देण्याची गरज असल्याचे मत हिंगोलीच्या दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी शुक्रवारी तारीख ५ केसापूर येथे व्यक्त केले. हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे पोलिस अधीक्षक निलाभव रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिला पोलिस कर्मचारी आरती साळवे, पोलिस अंमलदार गणेश सोनटक्के, पोलिस हवालदार हिम्मतराव सरनाईक, तथागत इंगळे, मुख्याध्यापक हरिभाऊ मुटकुळे, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रेमलता जगताप यांनी महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती दिली. महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, सायबर गुन्हे, मानवी तस्करी तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर विषयांवर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिला अद्यापही अन्याय सहन करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अन्यायाच्या घटना वारंवार घडत असून आता महिलांनीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या संरक्षणासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विविध कायदेशीर तरतुदींची माहिती देत कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार किंवा शोषणाची घटना घडल्यास तात्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ॲड सरस्वती कोरडे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, गाव बाल संरक्षण समिती, पोक्सो कायदा, बाल संरक्षण यंत्रणा, संकटग्रस्त व गरजू बालकांसाठी उपलब्ध शासकीय सुविधा, बालकल्याण समितीची भूमिका तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बालकांवरील अत्याचार, दुर्लक्ष, शोषण अथवा बालविवाहाची माहिती मिळाल्यास ती तात्काळ संबंधित यंत्रणांना देण्याचे आवाहन त्यांनी केले. चाईल्ड हेल्पलाईन 1098 या मोफत व 24 तास उपलब्ध असलेल्या आपत्कालीन सेवेबाबत माहिती देत अडचणीत असलेल्या किंवा संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. बालकांना कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अथवा इतर कोणतेही बालक संकटात आढळल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला, युवक व बालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे तसेच त्यांच्या शंकांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप यांनी उत्तरे देऊन निरसन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *