![]()
महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे. विभागातील बदल्या डिजिटल प्रणालीद्वारे केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहेत. तसेच, बदली प्रक्रियेत गुणवत्ता, सेवाज्येष्ठता, प्राधान्यक्रम आणि नियमांचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार केला जाणार आहे. राज्य शासन विविध विभागांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर वाढवत असून महिला व बाल विकास विभागातही डिजिटल प्रशासनाला प्राधान्य दिले जात आहे. या नव्या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना बदलीसाठी वारंवार कार्यालयीन पाठपुरावा करण्याची गरज कमी होणार आहे. ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज सादर करणे, प्राधान्यक्रम नोंदवणे तसेच बदली प्रक्रियेची स्थिती पाहणे शक्य होणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ होईल. विशेषतः दुर्गम भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना पारदर्शक निकषांनुसार संधी मिळाल्याने प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिला व बाल विकास विभागाच्या या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून, डिजिटल व्यवस्थेमुळे अनियमितता आणि पक्षपाताला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आगामी काळात विभागातील इतर प्रशासकीय प्रक्रिया देखील ऑनलाइन प्रणालीशी जोडण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वादळी वाऱ्याचा फटका बसलेल्यांना तात्काळ मदत दुसरीकडे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेत. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिकांना मदत पोहोचविण्यात यावी, असे त्या म्हणाल्यात. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही धोका किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. या संकटाच्या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून सर्व यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
Source link
महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता ऑनलाइन:कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ व न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार