![]()
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पावन जन्मभूमी असलेल्या आपेगाव येथे रक्षाबंधनाचा सोहळा शुक्रवारी पार पडला. मुक्ताई संस्थानच्या वतीने आलेल्या भगिनींनी संत ज्ञानेश्वर महाराजांची पूजा करून माऊलींच्या चरणी राखी अर्पण केली. या विशेष सोहळ्यात साधनाताई भागवतराव पाटील आणि भारतीताई महेंद्र पाटील यांनी माऊलींची विधिवत पूजा केली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने दोन्ही भगिनींचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुक्ताई संस्थांच्या वतीने वारकरी, साधक व गावकऱ्यांना राखी बांधून स्नेहबंध दृढ करण्यात आले. यावेळी राम काका, जिजाभाऊ मिसाळ, नरके, थोरात, ओरडे, सूर्यकांत काळे, योगेश महाराज, राम महाराज, तांबे, कदम महाराज, तात्यासाहेब मोरे, माऊली मिसाळ यांच्यासह ज्ञानेश अध्यात्म संस्थेतील विद्यार्थी व साधकांना राखी बांधण्यात आली. रक्षाबंधनाच्या माध्यमातून संतपरंपरेतील बंधुभाव, आपुलकी, श्रद्धा आणि अध्यात्मिक एकात्मतेचा सुंदर संदेश उपस्थितांना देण्यात आला. या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्यास आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर प्रमुख उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
Source link
माउलींच्या चरणी बहिणींच्या राखीने जपला भक्तीचा धागा:मुक्ताई संस्थानच्या वतीने राखी बांधून स्नेहबंध दृढ