![]()
भारतीय सीमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिराच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ‘एक राखी सैनिकासाठी’ हा स्तुत्य उपक्रम राबविला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था (अंबाजोगाई) यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या २३४ राख्या आणि भावपूर्ण शुभेच्छापत्रे देशाच्या विविध भागांतील सैनिकांकडे रवाना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी अत्यंत आकर्षक राख्या तयार केल्या होत्या. त्यासोबत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी जिव्हाळ्याचे संदेश देणारी शुभेच्छापत्रेही लिहिली. या राख्या व पत्रे जम्मू-काश्मीर, झारखंड, मथुरा, गडचिरोली, पुणे आणि मुंबई येथे तैनात जवानांपर्यंत पोहोचवण्यात आली. मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मिनाक्षी पिंपळे, अर्चना गिरवलकर, समृद्धी डिघुळे, आशुतोष पानगे, शुभांगी सदावर्ते, प्रियंका निकाळजे, उज्वला कुटे, राखी धोकटे, रुपाली बोर्डे आणि प्रफुल्लचंद्र कावसानकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी देशभावना केंद्रस्थानी ठेवून हा सुंदर उपक्रम राबविला. यासाठी पालकवर्गाचेही मोठे सहकार्य लाभले, असे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी सांगितले. बालमनात रुजवले राष्ट्रप्रेमाचे संस्कार सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची जाणीव बालमनात रुजावी आणि त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षकांनी पत्ता शोधण्यापासून ते टपाल पाठवण्यापर्यंत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
Source link
‘एक राखी सैनिकासाठी’ उपक्रमा तून विद्यार्थ्यांनी जपला कृतज्ञतेचा धागा:पैठणच्या आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरने राबवला उपक्रम