![]()
पुणे पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर असलेल्या ५० विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी एक विशेष दुर्गभ्रमण, समुपदेशन आणि पुनर्वसन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमांतर्गत, या बालकांना ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर नेण्यात आले, जिथे त्यांना सकारात्मक आणि जबाबदार जीवन जगण्याची प्रेरणा देण्यात आली. पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिंहगड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त विजय कुंभार यांच्या देखरेखीखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे नसून, विधीसंघर्षग्रस्त बालकांमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांचे सुधारणा आणि पुनर्वसन करणे हा आहे. सिंहगडावरील या भेटीदरम्यान, बालकांना गुन्हेगारीचा मार्ग सोडून सन्मानाने आणि जबाबदारीने जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात आयोजित संवादात्मक सत्रांमध्ये, पोलिस अधिकाऱ्यांनी बालकांशी शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या विविध संधी, कौटुंबिक मूल्ये आणि गुन्हेगारीमुळे भविष्यात होणारे गंभीर परिणाम यावर सविस्तर चर्चा केली. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सकारात्मक योगदान देणारे जबाबदार नागरिक म्हणून जीवन जगण्याची प्रेरणा देण्यात आली. परिमंडळ-३ मधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे पोलिस निरीक्षक, विविध पोलिस ठाण्यांची गुन्हे शोध पथके आणि सर्व्हेलन्स पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी ‘साय नो टू ड्रग्स, येस टू लाइफ’ (Say No to Drugs, Yes to Life) हा संदेश देत बालकांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी आणि गरज पडल्यास व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्याबाबतही त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पुणे पोलिसांच्या या उपक्रमामुळे बालगुन्हेगारी रोखण्यास मदत होईल, तसेच सुरक्षित आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीला हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Source link
50 विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुणे पोलिसांकडून सिंहगड सफर:गुन्हेगारीपासून दूर ठेवून त्यांना सकारात्मक जीवनाची प्रेरणा