![]()
सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून लावले जाणारे डीजे आणि लाऊडस्पीकर गरज पडल्यास बलप्रयोगाने बंद करावेत, या पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या भूमिकेमुळे सध्या पुणे-मुंबईसह राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर या मुद्द्यावरून दोन गट पडले असून, एक गट डीजे आणि ढोल-ताशांच्या समर्थनार्थ, तर दुसरा गट ध्वनिप्रदूषणाचा दाखला देत डीजेबंदीच्या बाजूने उभा ठाकला आहे. या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनीही डीजेबंदीला जाहीर पाठिंबा दिला असून, गेल्या वर्षी डीजेच्या दणदणाटामुळेच आपल्या सख्ख्या चुलत भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मेघना बोर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, सर्वांना न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे. गेल्या वर्षी गणेशोत्सवात माझा सख्खा भाऊ फक्त डीजेमुळे मृत्युमुखी पडला. आपण वारंवार सांगतो की सर्वोच्च न्यायालयानेही डीजेवर बंदी घातली आहे. परंतु, लोकांना ते मान्य नाही. डीजेमुळे घातक परिणाम होऊ शकतात, हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे, असे मत बोर्डीकर यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या, डीजेवर बंदी घालणे हे योग्य आहे. डीजे वाजवायला नको. आपण सगळे सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. परंतु, त्यापासून त्रास व्हायला नको, याची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अप्रत्यक्षपणे डीजे न लावण्याचा सल्ला दिला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. फडणवीस बोलताना म्हणाले होते की, पुण्यातील लोक सुजाण आहेत. ते आपली परंपरा जपूनच गणेशोत्सव साजरा करतील, असे त्यांनी म्हटले होते. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. ‘डीजे बंदीमुळे काहींना वाईट वाटत असेल तर वाटू द्या’:संजय शिरसाटांची ठाम भूमिका, ‘लोकांचा जीव महत्त्वाचा की आनंद?’ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डीजे बंदीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “डीजे बंदी झाली पाहिजे, हेच आमचे स्पष्ट मत आहे. डीजे बंदीमुळे काही लोकांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या; मात्र लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की आनंद?”, असा सवाल शिरसाट यांनी केला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले. सविस्तर वाचा
Source link
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू डीजेमुळेच झाला:डीजेवर बंदी घालणे योग्यच, न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे- मेघना बोर्डीकर