Headlines

मान्सूनची गोव्यात धडक, 48 तासांत कोकणात एन्ट्री:मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी




देशभरात नैऋत्य मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू असून आता महाराष्ट्रातही पावसाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने गोव्यात प्रवेश केला असून तो आता महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीकडे झपाट्याने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वाढली आहे. 5 जून ते 11 जून या कालावधीत राज्यातील विविध भागांत पावसाचा प्रभाव दिसून येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहे. अनेक भागांत पूर्वमान्सूनच्या सरी कोसळत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर केला आहे. नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच संभाजीनगर, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात आज उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुंबईत कमाल तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईकरांसाठी येणारे काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पावसाचे वातावरण यंदा मान्सूनचे केरळमधील आगमन नेहमीपेक्षा उशिरा झाले. साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचणारा मान्सून यंदा 4 जून रोजी दाखल झाला. म्हणजेच त्याचे आगमन सुमारे 3 दिवस उशिराने झाले. मात्र केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने वेग पकडला असून सलग दुसऱ्या दिवशीही त्याची प्रगती सुरू राहिली. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. बंगालच्या उपसागरातील काही क्षेत्रांपर्यंत मजल शुक्रवारी मान्सूनने पूर्व-मध्य अरबी समुद्राचा काही भाग व्यापला. त्याचबरोबर गोव्याचा काही भाग, कर्नाटक, तमिळनाडू तसेच बंगालच्या उपसागरातील काही क्षेत्रांपर्यंत त्याने मजल मारली. सध्या मान्सूनची सीमा पणजी, बंगळूर, सालेम आणि पंबन बेटापर्यंत पोहोचली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकणार असून संपूर्ण गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील काही प्रदेशांत त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन दिलासादायक ठरणार याशिवाय बंगालच्या उपसागरातूनही मान्सूनची पुढील वाटचाल सुरू राहणार आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्येही लवकरच मान्सून पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विशेषतः कोकण किनारपट्टीवर पहिल्या पावसाची शक्यता वाढली असून शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लागले आहे. उष्णतेने त्रस्त झालेल्या जनतेसाठी मान्सूनचे आगमन दिलासादायक ठरणार आहे. सुमारे 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या पावसाबाबत सुधारित अंदाजही जाहीर केला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे सुमारे 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, असा अंदाज आहे. मात्र मान्सूनच्या प्रवासाचा वेग वाढल्यामुळे महाराष्ट्रात वेळेत पाऊस दाखल होईल, अशी आशा निर्माण झाली असून येत्या काही दिवसांत मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *