![]()
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत मावळ तालुक्यातील आंबी येथील अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड (डी-मार्ट) येथे तपासणी केली. कमी दर्जाचे आणि चुकीचे लेबल लावलेले असल्याचा संशय असलेले 20 हजार 85 लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत 50 लाख 27 हजार 893 रुपये आहे. अन्न प्रशासनाने खाद्यतेलाचे नऊ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या सहआयुक्त प्रीती तिपरे आणि पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. मावळ तालुक्यातील मौजे आंबी येथील गट क्रमांक 113 मधील शेड क्रमांक 1 येथे तपासणी करण्यात आली. तपासणीत खाद्यतेल कमी दर्जाचे (सबस्टँडर्ड) आणि त्यावर दिशाभूल करणारे लेबल असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. जप्त साठ्यात आधारचे रिफाइंड सूर्यफूल तेल, फॉर्च्युनचे राइस ब्रॅन ऑइल, पतंजलीचे कच्ची घाणी मोहरी तेल आणि सफोलाचे कोल्ड प्रेस्ड मोहरी व शेंगदाणा तेल यांचा समावेश आहे. पुणे गुप्तवार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी कारवाईसाठी माहिती गोळा केली होती. सहाय्यक आयुक्त डी. एस. साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. भिसे आणि एस. एस. हाके यांच्या पथकाने तपासणी केली. नऊ नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली.
Source link
मावळच्या डी-मार्टमधून 20 हजार लिटर खाद्यतेल जप्त:50 लाख 27 हजार 893 रुपयांचा साठा; नऊ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत