Headlines

मुंबईत धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार:पावसाचे पाणी आत आल्याने दरवाजा बंद करण्यावरून वाद; तरुणाची चाकू भोसकून हत्या




मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. चालत्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात केवळ लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक वादातून एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव असून, मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अंधेरी ते बोरिवली स्थानकांदरम्यान हा रक्तरंजित थरार घडला. मंगळवारी रात्री मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात पावसाचे पाणी आणि तुषार आत येत होते. यामुळे डब्यात बसलेल्या काही प्रवाशांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले. याच कारणावरून मयंक आणि दुसऱ्या एका प्रवाशामध्ये बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता हा वाद इतका विकोपाला गेला की, समोरच्या माथेफिरू प्रवाशाने संतापाच्या भरात स्वतः जवळील धारदार चाकू काढून मयंकवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, रक्तबंबाळ झालेल्या मयंकचा ट्रेनमध्येच तडफडून मृत्यू झाला. मारेकरी फरार; पोलिसांकडून सीसीटीव्हीचा तपास सुरू मयंकवर वार केल्यानंतर डब्यात एकच गोंधळ उडाला, आरोपी अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत पसार झाला. याप्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. पोलिस सध्या ट्रेनमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे जबाब नोंदवून घेत असून, अंधेरी ते बोरिवली दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांमध्ये घबराट; ४ महिन्यांतील ही दुसरी घटना या घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मुंबईकरांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत पश्चिम रेल्वे मार्गावर घडलेली ही अशी दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी देखील बोरिवली स्थानकाजवळ लोकलच्या दरवाज्यात उभे राहण्याच्या वादातून एका प्रवाशाची अशीच चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. लागोपाठ घडणाऱ्या या जीवघेण्या प्रकारांमुळे दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या मनात कमालीची दहशत निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *