![]()
वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान बुधवारी पहाटे एक गंभीर अपघात घडला. पहाटे सुमारे चारच्या सुमारास ही घटना घडली. मेट्रोच्या पिलरवर महाकाय गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना अचानक संतुलन बिघडले आणि मोठा बीम खाली कोसळला. या घटनेत बीम उचलण्यासाठी वापरण्यात आलेली अवजड मोबाईल क्रेनही उलटली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी सुरू असलेल्या कामादरम्यान गर्डर उचलण्याची प्रक्रिया सुरू होती. पिलरवर बीम बसवण्यासाठी क्रेनद्वारे तो वर नेला जात असताना अचानक तोल गेला. त्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण बीम खाली कोसळला आणि त्याचा भार सहन न झाल्याने क्रेनही जागीच पलटी झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या प्रशासनाकडून घटनास्थळी क्रेन हटवण्याचे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा मुंबईतील मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांच्या कामांतील सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात वारंवार अशा दुर्घटना घडत असताना त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली निष्काळजीपणा होत असल्याचा आरोपही आता अधिक तीव्र होत आहे. कंत्राटदार कंपन्यांच्या चुकीमुळे लोकांच्या जीवाशी खेळ या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, बीकेसीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी झालेली ही दुर्घटना अत्यंत गंभीर आहे. कंत्राटदार आणि सल्लागार कंपन्यांच्या चुकीमुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला. जबाबदारी निश्चित करण्याची गरज तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या कंत्राटदार आणि संबंधित सल्लागार कंपनीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरवेळी अपघात घडल्यावर फक्त चौकशीची घोषणा केली जाते, पण ठोस कारवाई होत नाही, असेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर बीकेसीतील या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Source link
मुंबईत बीकेसी मेट्रो साइटवर मोठा अपघात:गर्डर कोसळला, क्रेन उलटली; लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा ठाकरे गटाचा आरोप