![]()
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथे म्हाडाच्या इमारतीची बाल्कनी कोसळून एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे ईस्टर्न फ्रीवेवर दोन एसयूव्ही गाड्यांमध्ये हाय-स्पीड धडक होऊन भीषण अपघात झाला. या दोन्ही घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाळकेश्वरमध्ये बाल्कनी कोसळली मंगळवारी रात्री सुमारे ११.२२ वाजता वाळकेश्वरमधील बाभुळनाथ रोडवरील ‘सूर्यप्रकाश बिल्डिंग’ या म्हाडाच्या तळमजला अधिक तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग अचानक कोसळला. याचवेळी इमारतीखालून पायी जात असलेले संतोष रामचंद्र भरास्कर (वय ५१) यांच्या अंगावर ढिगारा पडला. भरास्कर हे जवळील पेट्रोल पंपावर काम करत होते. अग्निशमन दलाचे तातडीने बचावकार्य घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, पालिका अधिकारी, ‘बेस्ट’चे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका पथक घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखालून भरास्कर यांना बाहेर काढून तातडीने जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार या दुर्घटनेनंतर प्रशासनाने संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. बाल्कनी कोसळतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ईस्टर्न फ्रीवेवर दोन SUVची भीषण धडक दरम्यान, मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवर दोन कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाड्यांमध्ये भरधाव वेगामुळे भीषण अपघात झाला. एका इलेक्ट्रिक कार आणि ह्युंदाई व्हेन्यू या गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अतिवेगाचा संशय; तपास सुरू प्राथमिक माहितीनुसार अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांकडून दोन्ही घटनांचा पुढील तपास सुरू आहे. हे ही वाचा.. महाराष्ट्रात पुढचे 8 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा:मुंबई-कोकणासह 29 जिल्ह्यांना अलर्ट, परभणीत ओढ्याच्या पुरात महिला वाहून गेली राज्यात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून अनेक भागांत पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, १ जुलैपासून पुढील ८ दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा मोठा इशारा (Red/Orange Alert) जारी केला आहे. कोकण, मुंबईसह राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून, शेतातून घरी परतत असताना ओढ्याला आलेल्या पुरात एक ६५ वर्षीय शेतकरी महिला वाहून गेल्याची धक्कादायक माहिती आहे. सविस्तर वाचा
Source link
मुंबईत मध्यरात्री पावसाचा हाहाकार!:वाळकेश्वरमध्ये बाल्कनी कोसळून एकाचा मृत्यू; ईस्टर्न फ्रीवेवर दोन SUVचा भीषण अपघात