![]()
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत अपघाताच्या दोन वेगवेगळ्या भीषण घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनर आणि ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. तर दुसऱ्या घटनेत अंबरनाथ-उल्हासनगर मार्गावर मध्यरात्री एका भरधाव कारने धुमाकूळ घालत अनेकांना धडक देऊन जखमी केले. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज (दिनांक 01 जून) पहाटे 4.30 च्या सुमारास खोपोलीनजीक एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे तेलाचे डबे घेऊन जाणारा एक भरधाव कंटेनर चलकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उलटला. कंटेनर उलटला तेव्हा मागून तांदूळ घेऊन जाणारा एक ट्रक वेगाने येत होता. वेग जास्त असल्याने ट्रक चालकाला वाहन कंट्रोल करता आले नाही आणि हा ट्रक थेट उलटलेल्या कंटेनरवर जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकमधील चालक आणि क्लीनरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवजड वाहनांच्या धडकेत बाजूने जाणारी एर्टिगा कारही अडकली या दोन अवजड वाहनांच्या भीषण धडकेच्या कचाट्यात बाजूने जाणारी एक एर्टिगा कारही सापडली असून, कारमधील 80 वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, हायवे पोलिस आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न करत अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. अंबरनाथमध्ये भरधाव कारची पादचाऱ्यांना धडक दुसऱ्या घटनेमध्ये अंबरनाथ ते उल्हासनगर दरम्यान रविवारी मध्यरात्री एका भरधाव स्विफ्ट डिझायर कारने रस्त्यावरील पादचाऱ्यांना तसेच इतर वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात अनेक लोक जखमी झाले असून यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर स्थानिकांनी फॉलोवर लाइन चौक येथे कारला वेढा घातला आणि संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. मात्र, यावेळी लोकांच्या गोंधळाचा फायदा घेत कारचालक कार सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, फरार कार चालकाचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेणे सुरू आहे.
Source link
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भयंकर अपघात!:आधी कंटेनर उलटला नंतर त्याला भरधाव ट्रक जाऊन आदळला, दोघांचा जागीच मृत्यू