Headlines

मुंबई महापालिकेला पुन्हा धमकीचा ई-मेल:अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला, मेट्रो स्टेशन आणि महालक्ष्मी रेसकोर्सला उडवण्याची धमकी




मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर गुरुवारी सकाळी धमकीचा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये मुंबई महापालिकेचे मुख्यालय आणि महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याचाही या मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईतील काही महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे आणि मेट्रो स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10.12 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या ई-मेल आयडीवर हा धमकीचा संदेश प्राप्त झाला. या मेलमध्ये मुंबई महापालिकेचे मुख्यालय आणि महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. केवळ महापालिका कार्यालयच नव्हे, तर अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला देखील लक्ष्य असल्याचे मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह मुंबई पोलिसांसमोर सुरक्षेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महालक्ष्मी, मेट्रो स्टेशन आणि रेसकोर्सचाही उल्लेख या धमकीच्या मेलमध्ये महालक्ष्मी परिसर, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुंबईतील मेट्रो स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ एका ठिकाणापुरती ही धमकी मर्यादित नसून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणांची सुरक्षा आणि तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. धमकीचा मेल मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांत मुंबई महापालिकेला अशा प्रकारचे धमकीचे मेल पाच वेळा प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार अशा धमक्या येत असल्याने या प्रकरणामागे नेमके कोण आहे, धमकी देणाऱ्यांचा उद्देश काय आहे आणि हे मेल कुठून पाठवले जात आहेत, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. यापूर्वीही अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला धमकी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला यापूर्वीही बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. या धमकीनंतर त्यांच्या बंगल्याबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. रविवारी नेहमीप्रमाणे चाहत्यांची भेट घेण्यासाठी अमिताभ बच्चन बंगल्याबाहेर आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी बुलेटप्रूफ काचेच्या आडून चाहत्यांना अभिवादन केले होते. या घटनेनंतर धमकी देणाऱ्यांकडून बुलेटप्रूफ काचेतूनही हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली होती. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनाही धमक्यांचे सत्र गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. अभिनेता सलमान खान, टायगर श्रॉफ आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याशी संबंधित धमकी आणि गोळीबाराच्या घटनांमुळे चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टलाही ग्रेनेड हल्ल्याची धमकी देण्यात आल्याची घटना यापूर्वी समोर आली होती. या पार्श्वभूमीवर कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता मुंबई महापालिकेला आलेल्या ताज्या धमकीच्या मेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आल्याने पोलीस प्रशासनासमोर तपासाचे आव्हान आहे. वारंवार धमकीचे मेल पाठवणाऱ्यांचा शोध घेऊन अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस कोणती पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे ही वृत्त वाचा विद्येचे माहेरघर आता गुंडांचे माहेरघर झाले:राज्यात कायद्याचे राज्य राहिले नाही, गृहमंत्रालय अपयशी, भाजपकडून गुंडांना आश्रय, मुंबईतील व्यापारी दहशतीखाली- संजय राऊत पुणे हे विद्येचे माहेरघर होते, ते आता गुंडांचे माहेरघर झाले आहे. पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत? नागपुरातसुद्धा असेच वातावरण आहे. राज्यात कायद्याचे राज्य नाही, म्हणजेच गृहमंत्रालय अपयशी ठरले आहे असा त्याचा अर्थ होतो. ज्यांच्याकडे हे खाते आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *