![]()
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार अभिजित वंजारी यांनी मिळवलेल्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी आधी केलेले आणि नंतर डिलीट करावे लागलेले एक ट्विट तसेच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर झालेली निवडणूक, या मुद्द्यांवरून रोहित पवार यांनी थेट फडणवीसांना डिवचले आहे. ‘संघाच्या मुख्यालयातच भाजपला पराभव बघावा लागला’ नागपूर हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानला जातो. याच मुद्द्यावर बोट ठेवत रोहित पवार म्हणाले, “आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घातलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात, ज्या ठिकाणी आपण स्वतः घरोघरी जाऊन बंडखोरांना माघार घेण्यासाठी मनवले, त्याच नागपूर मतदारसंघात, संघाचे मुख्यालय असलेल्या भागात भाजपला पराभव बघावा लागला, याचा अर्थ स्पष्ट आहे.” ‘सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे’ देवेंद्र फडणवीस यांनी निकालापूर्वी किंवा सुरुवातीच्या कलांदरम्यान केलेले एक ट्विट नंतर डिलीट केले होते, यावरून पवारांनी त्यांना घेरले. “आपल्याला ट्विट डिलीट करावे लागले, याचे दुःख आहेच; पण आपल्या डिलीट झालेल्या ट्विटमध्ये दिसत असलेला सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे. असो, समजू शकतो,” असा टोला त्यांनी लगावला. ‘बॅलेट पेपरचा विसर पडला असावा’ ईव्हीएमवर सतत संशय व्यक्त करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीत बॅलेट पेपरचा मुद्दा लावून धरला होता. याच संदर्भात रोहित पवार पुढे म्हणाले, “कदाचित निवडणूक बॅलेटवर (मतपत्रिकेवर) झाली होती, याचा आपल्याला विसर पडला असावा, म्हणून आधीच ट्विट झाले असेल.” या विधानातून त्यांनी ईव्हीएम आणि बॅलेट पेपरच्या फरकावर सूचक भाष्य केले आहे. अभिजित वंजारींचे केले अभिनंदन रोहित पवार यांनी विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, मतदानरूपी आशीर्वाद देणाऱ्या पदवीधर मतदारांचे आभार मानत, निवडणुकीच्या रिंगणात लढणाऱ्या सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रोहित पवार यांच्या या आक्रमक पोस्टमुळे आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा शाब्दिक सामना सोशल मीडियावर आणखी रंगण्याची शक्यता आहे. —————- हेही वाचा.. विधान परिषद निकाल: सतीश चव्हाणांचा 18 वर्षांचा गड का ढासळला? मतदारांचा रोष अन् रीलस्टार साबळे, कराळे मास्तरांनी कसे फिरवले विजयाचे गणित? 5 जागांचे सविस्तर विश्लेषण
विधान परिषदेच्या पाचही जागांचे निकाल जाहीर झाले. त्यात पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव, पुणे शिक्षक – भाजपचे कौस्तुभ गावडे, अमरावतीत शिवसेनेचे सरनाईक, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे वंजारी आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील १८,१२४ मतांनी विजयी झाले. सविस्तर वाचा
Source link
मुख्यमंत्री फडणवीसांनी डिलीट केलेल्या ट्विटवरून रोहित पवारांची टीका:म्हणाले- सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे, कदाचित बॅलेट पेपरचा विसर पडला असेल