Headlines

मुलीच्या जन्माचा सन्मान करून तिला शिक्षणाची समान संधी द्यावी- वानखडे:दिवाळीनिमित्त वघाळ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ‘एक दिवा कन्ये’ साठी उपक्रम




‘दिवाळीत घराघरांत दिवे लावून अंधार दूर केला जातो. याच सणाचे औचित्य साधून वघाळ येथील जिल्हा परिषद शाळेने मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. ‘एक दिवा कन्येसाठी’ या उपक्रमातून मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासोबतच तिच्या शिक्षणाला आणि स्वप्नांना प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला. कन्या म्हणजे ओझे नसून ती कुटुंबाचे आणि समाजाचे भविष्य आहे. त्यामुळे तिच्या जन्माचा सन्मान करून तिला शिक्षणाची समान संधी द्यावी,’ असे आवाहन गाडेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख अरविंद वानखडे यांनी केले. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी व उर्दू शाळा वघाळ येथे दीपोत्सवानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीलेश शेंगोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून वंडली शाळेचे मुख्याध्यापक संजय बेले, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अफसर खान, समिती सदस्य विजय भोरे आणि मुख्याध्यापक प्रकाश विंचूरकर उपस्थित होते. मुलगी शिकली तर एक व्यक्ती सुशिक्षित होते; मात्र ती सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या विकासाला हातभार लागतो. आज मुली शिक्षणासह क्रीडा, कला, साहित्य, प्रशासन आणि संरक्षण अशा विविध क्षेत्रांत कामगिरी करत आहेत. त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे वानखडे म्हणाले. संजय बेले यांनीही कन्येचा जन्म हा कुटुंबासाठी आनंदाचा आणि समाजासाठी अभिमानाचा विषय असल्याचे सांगितले. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात घरातूनच होते. पालकांनी मुलगा आणि मुलगी असा भेद न करता दोघांनाही समान संधी दिली पाहिजे. मुलींना शिक्षणासह त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणेही आवश्यक आहे. शाळेत मिळणारे शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा यामुळे मुलींना पायावर उभे राहण्याची ताकद मिळते. केवळ शाळेत प्रवेश देणे पुरेसे नसून त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठीही कुटुंबाने लक्ष देणे गरजेचे आहे. मुलींच्या प्रगतीतूनच समाजाच्या विचारांमध्ये बदल घडू शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. मुख्याध्यापक प्रकाश विंचूरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थिनींना स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणे आणि मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अफसर खान आणि देवानंद बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत सामाजिक विषयांचीही माहिती मिळते. तसेच शाळेच्या माध्यमातून समाजात चांगले विचार पोहोचवण्यास मदत होते. कार्यक्रमात ‘पाणी वाचवा, पृथ्वीवरील जीवन वाचवा’ या विषयावर चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. आकाशकंदील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ऐहतेशाम पठाण याचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रंजना परतेती यांनी केले, तर देवानंद बागडे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी शहनाज परवीन, मेघा खोपे आणि ज्योती चांदूरकर यांनी परिश्रम घेतले. शेवटी विद्यार्थ्यांना लाडू, चिवडा आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *