![]()
लक्ष्मीपूजनासाठी घराघरांत लागणारी नवीन केरसुणी, ऊस, नारळ, झेंडूची फुले, फळे आणि इतर साहित्य खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. रस्त्याच्या कडेला उभारलेले फुलांचे आणि पूजासाहित्याचे स्टॉल, पणत्यांची दुकाने आणि रांगोळीच्या रंगांनी बाजारपेठेला सणाचे स्वरूप आले आहे. लक्ष्मीपूजनात नवीन केरसुणीला विशेष महत्त्व असल्याने बाजारात तिची दुकाने सजली आहेत. घरातील स्वच्छता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून केरसुणी खरेदी केली जाते, तर पूजेसाठी ऊस, नारळ, झेंडूच्या माळा, कमळाची फुले, बताशे, लाह्या, खारीक-बदाम यांनाही मागणी आहे. सफरचंद, पेरू, डाळिंब आणि सीताफळ यांसारखी फळेही पूजेच्या खरेदीत समाविष्ट आहेत. यंदा झेंडूच्या फुलांचे दर वाढलेले असतानाही ग्राहक फुले खरेदी करीत आहेत. पिवळ्या आणि नारंगी झेंडूच्या माळांना अधिक पसंती मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून वहीखात्यांची पूजा लक्ष्मीपूजन हा व्यापारी वर्गासाठीही महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे दुकाने, प्रतिष्ठानांत पूजेची तयारी सुरू आहे. नवीन वर्षाच्या व्यवहाराची सुरुवात करण्यासाठी व्यापारी नवीन वही, खाते, हिशोबाच्या डायऱ्या खरेदी करीत आहेत. या वहीखात्यांवर कुंकवाने शुभ-लाभ, स्वस्तिक काढून त्यांची पूजा केली जाते. जुने हिशोब पूर्ण करून नवीन आर्थिक व्यवहारांची नोंद सुरू करण्याची परंपरा आजही व्यापारी जपत आहेत. मातीच्या पणत्यांकडे नागरिकांचा कल ^यंदा बाजारात मातीच्या पारंपरिक पणत्यांसह विविध आकारांच्या आणि आकर्षक डिझाइनमधील पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरासमोर पणत्यांची आरास करण्यासाठी तसेच लक्ष्मीपूजनासाठी ग्राहक आवर्जून मातीचे दिवे खरेदी करीत आहेत. याशिवाय आकाशकंदील, रांगोळीचे रंग, धूप, अगरबत्ती, सुगंधित तेल आणि लक्ष्मीच्या मूर्तींनाही मागणी आहे. – क्रांती ढवळे, विक्रेत्या, अमरावती.
Source link
लक्ष्मीपूजनानिमित्त लगबग; फुले, फळे, पूजेच्या साहित्याला मागणी:सजावटीचे साहित्य, केरसुणी, ऊस, नारळ, झेंडूच्या माळांची बाजारपेठेमध्ये उलाढाल