Headlines

मुलीला बॅड टच; 35वर्षांच्या शेजाऱ्याला 10 अन् 11वर्षांच्या भावांनी चोपले:छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हा, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर




आई कामावर गेल्याची संधी साधून घरात एकट्या असलेल्या 13 वर्षांच्या मुलीला तंबाखू मागण्याच्या बहाण्याने शेजाऱ्यानेच बॅड टच केल्याची घटना समोर आली. मात्र, या प्रसंगात घाबरून न जाता पीडितेच्या 10 आणि 11 वर्षांच्या दोन भावांनी 35 वर्षांच्या आरोपीला चोप दिला आणि घरातून पळवून लावले. सिटी चौक पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. आरोपी अनिल प्रकाश खंडागळे (35) याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई एका बुटीकमध्ये काम करते. शनिवारी (8 ऑगस्ट) सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्या कामावर गेल्या होत्या. घरात त्यांची सातवीत शिकणारी 13 वर्षांची मुलगी, तिचा 10 वर्षांचा सख्खा आणि 11 वर्षांचा चुलत भाऊ असे तिघेच टीव्ही पाहत बसले होते. दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान, अविवाहित आरोपी अनिल खंडागळे याने दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. घरात आल्यावर त्याने मुलीकडे तंबाखूची पुडी मागितली. मुलीने फ्रिजवर ठेवलेली पुडी त्याला दिली, मात्र पुडी घेताना आरोपीने अचानक तिचा हात पकडला. मुलीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्या अंगावरून हात फिरवून बॅड टच केला. भावांचा थेट हल्ला अन् आरोपी पळाला शेजाऱ्याच्या या अनपेक्षित कृत्याने घाबरलेल्या मुलीने “तुम्ही असे का करता?” असे म्हणत आरडाओरड केली. बहिणीचा आवाज ऐकताच तिच्या दोन्ही लहान भावांनी आरोपीला मारायला सुरुवात केली. लहान मुलांचा हा आक्रमक प्रतिकार पाहून आरोपी अनिल खंडागळे याने स्वतःची सोडवणूक करत घरातून धूम ठोकली. रात्री उशिरा गुन्हा दाखल सायंकाळी 7 वाजता आई घरी आल्यानंतर मुलीने रडत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री उशिरा सिटी चौक ठाण्यात धाव घेत महिलेने फिर्याद दिली. यावरून पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुठाळ पुढील तपास करत आहेत. असे जरी असले तरी या घटनेमुळे नोकरदार पालकांसमोर मुलांना घरात एकटे सोडण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. पालकांनो, ही खबरदारी घ्या ■ नोकरीनिमित्त मुलांना घरी एकटे सोडताना त्यांना बॅड टच आणि गुड टचबद्दल मोकळेपणाने माहिती द्या.
■ घरात कोणीही अनोळखी किंवा परिचयाची व्यक्ती आली तरी दरवाजा उघडू नये किंवा एकटे असताना कोणालाही घरात प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट सांगा.
■ आंधळा विश्वास नको: शेजारी राहणाऱ्या व्यक्तींवरही आंधळा विश्वास ठेवू नका.
■ मदतीची पूर्वकल्पना : आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणाला संपर्क साधावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *