Headlines

"मुळा'त पाण्याची विक्रमी आवक, धरण आज 50 टक्के भरणार:पाणलोटात जोरदार पाऊस, दिवसभरात तब्बल 12 हजार क्युसेक्सने आवक‎




नगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाण्याची आवक सुरू झाली असून, शुक्रवारी (ता. २४) धरण ५० टक्के भरण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारी (२३ जुलै) सायंकाळी ६ वाजेच्या अहवालानुसार धरणात १०,०२६ क्युसेक्स वेगाने नवीन पाण्याची आवक सुरू होती. धरणातील एकूण पाणीसाठा १२,१७९ दशलक्ष घनफूट (एमएफटी) झाला असून, पाणीपातळी ४६ टक्क्यांवर पोहोचली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत नोंदवला गेलेला पाऊस (मिमी मध्ये): आंबित: १११ मिमी (जोरदार पाऊस), लव्हाळी: १०६ मिमी, शिसवद: ९२ मिमी, खडकी: ९० मिमी, सावरचोळ: २२ मिमी, इतर गावे: चास १२, डोळासने ११, कोतुळ ५, घारगाव ४, आणि मुळानगर येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी सकाळी धरणातील आवक तब्बल १२,०४१ क्युसेक्स पर्यंत पोहोचली होती. दिवसभरात ही आवक काहीशी मंदावून सायंकाळी १०,०२६ क्युसेक्सवर आली असली, तरी वरच्या भागात पावसाचा जोर कायम असल्याने रात्रीतून आवक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मुळा धरणातील पाणीसाठ्याने अगदी तळ गाठला होता. अवघा काही दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक राहिल्याने संपूर्ण नगर जिल्हा आणि राहुरी परिसरात चिंतेचे ढग जमा झाले होते. मात्र, ऐन गरजेच्या वेळी वरुणराजाने कृपा केल्याने मुळा धरणाची पातळी झपाट्याने वाढली आहे. यामुळे पिण्याचे पाणी, शेती आणि उद्योगांचा पाण्याचा गंभीर प्रश्न तूर्तास मिटला आहे. मुळा धरणात गुरुवारी पाण्याची मोठी आवक झाली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत धरणात पाणी साठा वेगाने वाढू लागल्याने केवळ राहुरीच नव्हे, तर मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, औद्योगिक वसाहती आणि महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. कोरड्या पडण्याच्या मार्गावर असलेल्या धरणात पुन्हा नवसंजीवनी आल्याचे चित्र असून लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *