Headlines

मोदींच्या आवाहनाला फडणवीसांचा प्रतिसाद:वंदे भारतने केला शिर्डी प्रवास; संदेश देण्याचा प्रयत्न, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डीचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने केला. त्यांच्या या प्रवासाची राज्यभरात चर्चा सुरू झाली असून, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाला प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. शिर्डीकडे रवाना होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याची गरज अधोरेखित केली. वाढती वाहतूक, इंधनाचा वाढता वापर आणि पर्यावरणावरील परिणाम लक्षात घेता नागरिकांनी रेल्वे, बस यांसारख्या सार्वजनिक साधनांचा अधिक वापर करावा, असे त्यांनी म्हटले. वंदे भारतसारख्या आधुनिक रेल्वे सेवेमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या कृतीकडे प्रतीकात्मक संदेश म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील नागरिकांनी शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडल्यास वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि इंधन खर्च कमी होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री स्वतः सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्याने याचा सकारात्मक परिणाम नागरिकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर दुसरीकडे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जळगाव आणि जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर रात्रीपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवरच रात्र काढावी लागत आहे. काही ठिकाणी तर नो स्टॉकचे फलक झळकत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *