Headlines

यशाधिपतीःवडील ट्रक ड्रायव्हर, वयाच्या 11व्या वर्षी दृष्टी गेली:जिद्दीने अंधारावर मात करत शिक्षणाधिकारी झाले, यशाधीपतीमध्ये सुजित शिंदे यांच्या अफाट संघर्षाची कहाणी




अंधारातही प्रकाशाचा एक किरण असतो; फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे. एकदा का तो सापडला की, येणारी कितीही संकटं असली तरी त्यावर मात करण्याची हिंमत माणसामध्ये निर्माण होते. हे वाक्य आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलं आहे सातारा तालुक्यातील लिंब गावचे सुजित रमाकांत शिंदे यांनी. त्यांची वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी अचानक दृष्टी गेली. शिक्षणाचे दिवस नुकतेच सुरू झाले होते आणि त्यातच नियतीने डोळ्यांसमोर अंधार केलेला. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती हार मानून बसली असती. मात्र सुजित यांनी संकटाच्या छातीवर पाय देत स्वतःची वाट स्वतःच निर्माण करण्याचा निर्धार केला. त्यांच्या याच धाडसी वृत्तीमुळे आज ते सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अर्थातच इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यामागे अनंत अडचणी, संघर्ष आणि जिद्दीची कहाणी आहे. आजच्या ‘यशाधीपती’ या मालिकेत जाणून घेऊयात सुजित शिंदे यांची काळजाला भिडणारी अफाट संघर्षाची कहाणी… वडील ट्रक ड्रायव्हर; शिक्षणाचं स्वप्न मात्र मोठं… मूळचे साताऱ्याचे असलेले सुजित शिंदे हे लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी असलेले विद्यार्थी. वडील ट्रक ड्रायव्हर. त्यांच्या हातावर काम करून पडलेले घटे आणि पाठीवरचा घाम पाहत सुजित मोठे झाले. वडिलांच्या कष्टांची जाणीव असल्यामुळेच खूप शिकून मोठं व्हायचं, हे स्वप्न त्यांनी लहानपणापासून उराशी बाळगलं. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. वयाच्या अकराव्या वर्षी सुजित यांची दृष्टी कायमची गेली. अंधत्व आल्यानंतर आता आपलं शिक्षण कसं होणार? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. मात्र, या कठीण काळात त्यांच्या मित्रांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. त्यांच्याकडे ‘अंध व्यक्ती’ म्हणून न पाहता, एक सामान्य मित्र म्हणून त्यांना जीवन जगण्यास मदत केली. ‘तू शरीराने अंध आहेस, पण मनाने नाहीस,’ ही भावना त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी मित्र त्यांना पोहायला घेऊन जात, क्रिकेट खेळायला घेऊन जात. सुजित यांना क्रिकेट खेळता यावं म्हणून विशेष आवाज करणारा चेंडूही ते घेऊन येत. त्या आवाजाच्या साहाय्याने सुजित चेंडूचा अंदाज घेत तो हवेत उडवत असत. खेळासोबतच त्यांचा अभ्यासही सुरू होता. मित्रांनी त्यांना कधीही कमजोर असल्याची जाणीव होऊ दिली नाही. याच काळात सुजित यांना शिक्षणाची गोडी लागली आणि ‘आपण पुढचं शिक्षण घेऊ शकतो,’ हा आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. या संघर्षात साताऱ्यातील ‘सत्यशोधक अंधसहयोग उपक्रम’ या एनजीओनेही त्यांना विश्वासाचा हात दिला. स्पर्धा परीक्षेची वाट का निवडली? शंभर टक्के अंधत्व असल्यामुळे सुजित यांना सायन्स शाखेत प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे करिअरच्या वाटाही मर्यादित होत्या. मात्र एनजीओच्या साथीने त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता आपली स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासाबद्दल सुजित सांगतात, “मला पूर्णपणे अंधत्व असल्यामुळे दहावीला कितीही चांगले मार्क आले असले तरीसुद्धा मला सायन्स घेता येत नव्हते. त्यानंतर मग जसा मार्ग मिळेल तसा मी पुढे जात गेलो. लोक म्हणायचे की अंध आहे तर मग कायच होणार? हा कुठल्यातरी शाळेत शिकवेल, नाहीतर गायक होईल. यांच्यासाठी हेच पर्याय योग्य असतात.” मात्र सुजित यांना या चौकटीत अडकून राहायचं नव्हतं. त्यांचा एक मित्र, ज्याने त्यांना पावलोपावली साथ दिली, तो PSI झाला. त्याच्याकडे पाहून सुजित यांच्या मनातही प्रश्न निर्माण झाला’आपण हे करू शकतो का?’ याच प्रश्नातून त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला सुरुवात झाली. एनजीओने वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या की, दृष्टिहीन व्यक्तीला अभ्यासासाठी मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क साधावा. त्यातून मिळालेल्या मदतीच्या आणि ऑडिओच्या माध्यमातून सुजित यांनी अभ्यास सुरू केला. समान संधीसाठी कोर्टात लढा सुजित यांच्या प्रवासात अनेकांनी त्यांचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सकारात्मक व्यक्तीही त्यांच्या आयुष्यात आल्या. स्पर्धा परीक्षा देताना पूर्ण अंधत्व असलेल्या आणि लो-व्हिजन कॅटेगरीतील उमेदवारांना मिळणाऱ्या सुविधा आणि संधींमध्ये काही अडचणी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. परीक्षेत लिहिण्यासाठी मिळणारा अतिरिक्त वेळ, MPSC मधील आकृत्यांवर आधारित प्रश्नांसाठी पर्यायी प्रश्न, जागांची ओळख पटवण्यासंबंधीच्या अडचणी अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला. या प्रश्नांसाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आणि कायदेशीर लढाही दिला. डोळ्यांना दृष्टी असतानाही संकटांसमोर खचणारे अनेक असतात. मात्र, दृष्टी गेल्यानंतरही संकटाला न जुमानता त्यावर मात करण्याची जिद्द सुजित यांनी दाखवली. आपल्या अडचणीला कवटाळून बसण्याऐवजी त्याच परिस्थितीला सोबत घेत पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एकापाठोपाठ एक परीक्षा; यशाची वाट मात्र सुरूच सुजित यांनी इतिहास विषयात M.A. केले आहे. 2008 मध्ये त्यांनी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाची (RRB) ज्युनिअर क्लर्क परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर 2009 ते 2018 या कालावधीत त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली. 2015 मध्ये प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी केंद्र स्तरावरील NET आणि राज्य स्तरावरील SET या दोन्ही परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या. 2009 ते 2015 या कालावधीत पाच वेळा पूर्व परीक्षेत यश मिळवत त्यांनी UPSCच्या पाच मुख्य परीक्षा दिल्या. याशिवाय State Tax Inspector पदासाठीच्या पाच मुख्य परीक्षाही त्यांनी दिल्या. 2019 मध्ये त्यांची State Tax Inspector पदावर निवड झाली. मात्र त्यांनी ही नोकरी स्वीकारली नाही. रेल्वेतील नोकरीनंतर त्यांनी युनियन बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणूनही सात वर्षे काम केलं. नोकरी करत असतानाही मनातील अधिकारी होण्याचं स्वप्न मात्र कायम होतं. अखेर 2022 मध्ये MPSCची जाहिरात आली आणि 2025 मध्ये त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करत अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. ‘पत्नीच्या साथीने अधिकारी झालो’ ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो,’ असं म्हटलं जातं. सुजित यांच्या बाबतीत हे वाक्य अगदी तंतोतंत लागू होतं. त्यांच्या या संपूर्ण प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्यांच्या पत्नी अश्विनी. स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान अश्विनी सुजित यांच्या अभ्यासात मदत करू लागल्या. परीक्षेची पुस्तकं त्या तासन्‌तास स्वतः वाचत आणि त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवत. या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सुजित यांनी अभ्यास केला आणि पुढे नोकरी मिळवली. सुजित आणि अश्विनी यांची भेटही स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यानच झाली. सुजित यांना काम करताना पाहून अश्विनी यांना त्यांच्या जिद्दीचं कौतुक वाटलं. हळूहळू दोघांची मैत्री वाढली. अश्विनी त्यांच्या अभ्यासात मदत करू लागल्या आणि पुढे या नात्याचं रूपांतर प्रेमात झालं. या नात्याबद्दल सुजित सांगतात, “स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्ही भेटलो. तिचे लग्नाबद्दलचे विचार खूप वेगळे होते. आम्ही तसे दोघेजण नात्यातच येतो. तिने मला काम करताना पाहिलं आणि तिला नवल वाटलं की हा सगळं खंबीरपणे कसा करतो. त्यानंतर मग आम्ही भेटत गेलो. ती मला अभ्यासात मदत करायला लागली. नंतर तिनेच एक दिवस माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला की, ‘मला तू आवडतोस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.’ मला त्यावेळेस विश्वास नव्हता की कोणी माझ्याशी लग्न करेल. कारण एका अंध व्यक्तीसोबत कोण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेईल? मला वाटायचं की ती मला सहानुभूती म्हणून म्हणत असावी. मध्येच जर माझी साथ सोडून दिली तर काय करायचं? पण एका पॉईंटनंतर मला वाटलं की हीच माझी जोडीदार. त्यानंतर मग आम्ही सत्यशोधक पद्धतीने विवाह केला.” ‘मी कधी तुला अंध मानलंच नाही’ सुजित आणि अश्विनी यांची प्रेमकहाणी खरोखरच थक्क करणारी आहे. सुरुवातीला अश्विनी यांच्या आई-वडिलांनी या लग्नाला नकार दिला. मात्र दोघांचा निर्णय आणि एकमेकांवरील विश्वास ठाम होता. अखेर त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचीही साथ मिळाली. विशेष म्हणजे लग्नानंतर अनेक माध्यमांनी अश्विनी यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. तसा प्रस्ताव दिला. मात्र, त्यांनी तो नाकारला. त्यामागचं कारण सांगताना सुजित म्हणतात, “ती म्हणाली की, ‘मी जर मुलाखत दिली तर हे हायलाईट होईल की मी एका अंध व्यक्तीशी लग्न केलं आहे. मला तसं होऊ द्यायचं नाही. कारण मी कधी तुला अंध मानलंच नाही. माझ्यासाठी तू नेहमी खास आहेस. मी काही प्रसिद्धीसाठी तुझ्याशी लग्न केलं नाही.'” अश्विनींच्या या शब्दांनी सुजित यांना त्यांच्या नात्याची खरी ताकद जाणवली. कारण त्यांच्या आयुष्यात अश्विनी केवळ सहानुभूती घेऊन आलेल्या नव्हत्या, तर त्यांना समानतेने स्वीकारून त्यांच्या स्वप्नांचा भाग बनल्या होत्या. सुजित यांच्या यशामध्ये त्यांच्या पत्नीच्या या योगदानाचा वाटा मोठा आहे. मात्र या नात्याची खासियत केवळ अश्विनी यांनी सुजित यांना मदत केली, एवढीच नाही. दोघांनी एकमेकांच्या स्वप्नांना स्वतःची स्वप्नं मानलं. त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी ही केवळ एका दृष्टिहीन व्यक्तीशी लग्न करणाऱ्या पत्नीची कथा राहत नाही; तर एकमेकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आयुष्याचा प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींची कहाणी ठरते. या प्रवासात अनेकदा सुजित यांना स्पर्धा परीक्षेचा प्रवास थांबवावासा वाटला. काही परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर त्यांचं मन खचत होतं. मात्र अशा वेळी त्यांना त्यांच्या शिक्षकांनी सांगितलेलं एक वाक्य आठवायचं ‘आपल्या भारतात असे अनेक लोक आहेत जे आपली स्वप्नं आपल्या मुलांवर लादतात.’ आपल्यासोबत असलेल्या लोकांची स्वप्नं, त्यांनी दिलेली साथ आणि आपल्यावर ठेवलेला विश्वास वाया जाऊ द्यायचा नाही, या विचाराने सुजित पुन्हा अभ्यासाला लागायचे. त्यामुळे प्रत्येक अपयशानंतर त्यांचा प्रवास पुन्हा नव्या जोमाने सुरू होत राहिला. तंत्रज्ञानामुळे अभ्यास झाला सोपा आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानामुळे दृष्टिहीन व्यक्तींसाठी शिक्षणाच्या अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. सुजित यांच्या अभ्यासातही तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरली. ते सांगतात, “तंत्रज्ञानाच्या मदतीने माझ्या कॅटेगिरीमध्ये येणाऱ्या व्यक्तींना खूप फायदा होतो. जेव्हा पुस्तकं ऑडिओच्या स्वरूपात हवी असतात तेव्हा कोण्या व्यक्तीची गरज पडत नाही. कारण एनजीओमध्ये अशा मशीन आल्या आहेत, ज्यामध्ये बुक स्कॅन करून ते काही क्षणात ऑडिओ फॉरमॅटमध्ये रूपांतरित होतं. तसेच काही सॉफ्टवेअर आहेत, ज्यामध्ये पुस्तकं PDFच्या स्वरूपात असतील तर ते सॉफ्टवेअर आम्हाला ऑडिओच्या माध्यमातून वाचून दाखवतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देताना आम्हाला अडचण येत नाही.” अर्थात, तंत्रज्ञानाने त्यांच्या अभ्यासाची वाट सोपी केली; पण त्या साधनांचा उपयोग करून यश मिळवण्यासाठी लागणारी मेहनत आणि जिद्द मात्र सुजित यांचीच होती. ‘सहानुभूती नको, आमची क्षमता पाहा’ दृष्टिहीन व्यक्तींकडे समाजाने केवळ सहानुभूतीच्या नजरेने पाहण्याऐवजी त्यांच्या क्षमतेची दखल घ्यावी, अशी सुजित यांची भूमिका आहे. ते म्हणतात, “आम्ही अंध आहोत म्हणजे आम्हाला प्रत्येक ठिकाणी सहानुभूती मिळावी असं नाही. आमची देखील क्षमता खूप वेगळी आहे. अनेकजण म्हणतात की हे आरक्षण घेऊन या खुर्चीवर बसले आहेत. मला त्या लोकांना सांगायचं आहे की आमच्यातील गुण-दोष बघण्यापेक्षा आमची क्षमता पाहून त्याची कदर ठेवली पाहिजे.” “प्रत्येकामध्ये काही ना काही मॅजिक असते. ती ओळखून एक नॉर्मल व्यक्ती म्हणून वागण्याचा दृष्टिकोन ठेवावा.” शिक्षणाधिकारी म्हणून आता नवं ध्येय डोळ्यांसमोर आलेला अंधार सुजित यांच्या स्वप्नांना रोखू शकला नाही. उलट त्याच अंधारातून त्यांनी स्वतःची वाट शोधली आणि आज ते सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून काम करत आहेत. आता या पदावर काम करताना शिक्षणाच्या क्षेत्रात काही महत्त्वाच्या बाबींवर काम करण्याचा त्यांचा मानस आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेणं किती गरजेचं आहे, हे पालकांना समजावून सांगण्यापासून ते सामाजिक दबावामुळे खासगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश देणाऱ्या पालकांना सरकारी शाळांमधील दर्जेदार शिक्षणाची जाणीव करून देण्यापर्यंत अनेक गोष्टींवर त्यांना काम करायचं आहे. खासगी शाळांच्या वाढत्या खर्चामुळे पालकांवर पडणारा आर्थिक भार कमी व्हावा, सरकारी शाळांमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावीपणे काम करता यावं, अशी त्यांची इच्छा आहे. वयाच्या अकराव्या वर्षी दृष्टी गेली, पण स्वप्नं पाहण्याची दृष्टी त्यांनी कधीच गमावली नाही. मित्रांची साथ, एनजीओचा आधार, पत्नीचा विश्वास, स्वतःची जिद्द आणि तंत्रज्ञानाची साथ या सगळ्यांच्या जोरावर सुजित शिंदे यांनी आपल्या आयुष्याचा अंधार उजळवला. त्यांची कहाणी एकच सांगते परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मनात जिद्द आणि सोबत विश्वास ठेवणारी माणसं असतील तर अडथळ्यांची भिंतही यशाची पायरी बनते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *