![]()
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे रासायनिक खतांचा संभाव्य तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे युरिया खताचा वापर कमी करूनही अधिक कार्यक्षम पद्धतीने उत्पादन वाढविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषी तज्ज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी केले. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम शिवारात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. ढगे म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर युरियाची मागणी करतात. मात्र, युरियाचा योग्य पद्धतीने वापर न झाल्याने त्याचा अपव्यय होतो. युरिया थेट मातीत देण्यापेक्षा तीन किलो युरिया १०० लिटर पाण्यात विरघळून फवारणी केल्यास पिकांना चांगला प्रतिसाद मिळतो. तसेच सकाळच्या वेळेत युरिया दिल्यास त्याचा अधिक फायदा होतो. अनेक शेतकरी दुपारच्या उन्हात खतांचा वापर करतात, त्यामुळे उष्णतेमुळे युरियाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. युरियामध्ये झिंक कोटेड, सल्फर कोटेड व नॅनो युरियाचा वापर केल्यास पिकांना अधिक फायदा होतो. तसेच युरियाचा वापर एकाच वेळी न करता विभागून दोन टप्प्यांत करावा. लागवडीच्या वेळी व त्यानंतर एक महिन्याने दिल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. एकदम जास्त प्रमाणात युरिया दिल्यास पाण्यावाटे किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचा ऱ्हास होऊन खर्च वाया जातो, असेही त्यांनी सांगितले. उसासारख्या उंच पिकांमध्ये ड्रोनद्वारे युरियाची फवारणी केल्यास खताच्या खर्चात बचत होते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविल्यास युरियाची गरज कमी होते. त्यासाठी ताग, धेंचा यांसारखी हिरवळीची खते घेणे फायदेशीर ठरते. तसेच चांगल्या कुजलेल्या शेणखतात युरिया मिसळून वापरल्यासही चांगले परिणाम मिळतात, असे मार्गदर्शन डॉ. ढगे यांनी केले. युरिया कमीत कमी वापरून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यक्षम आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण वाढवल्यास युरियाची गरज कमी उसासारख्या उंच पिकांमध्ये ड्रोनद्वारे युरियाची फवारणी केल्यास खताच्या खर्चात बचत होते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविल्यास युरियाची गरज कमी होते. त्यासाठी ताग, धेंचा यांसारखी हिरवळीची खते घेणे फायदेशीर ठरते. तसेच चांगल्या कुजलेल्या शेणखतात युरिया मिसळून वापरल्यासही चांगले परिणाम मिळतात, असे मार्गदर्शन डॉ. ढगे यांनी केले.
Source link
युरियाचा वापर कमी करत उत्पादन वाढवणे गरजेचे:कृषी तज्ज्ञ डॉ. अशोक ढगे यांचे प्रतिपादन, शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद