Headlines

रवींद्र पाठक यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार:पुण्यात ६ जून रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा




छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे धर्म, संस्कृती आणि इतिहास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुण्याचे समर्थभक्त रवींद्र पाठक यांना यंदाचा ४४ वा ‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. यंदा या प्रतिष्ठित पुरस्काराचे ४५ वे वर्ष असून, यापूर्वी डॉ. मिराशी, महादेवशास्त्री जोशी, सेतु माधवराव पगडी, लक्ष्मणशास्त्री जोशी, भालजी पेंढारकर, लता मंगेशकर आणि गोविंददेव गिरी महाराज यांसारख्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार वितरण सोहळा शिवराज्याभिषेक उत्सवानिमित्त शनिवार, ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यात काळे सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबामहाराज तराणेकर असतील, तर प्रमुख अतिथी म्हणून मोहनबुवा रामदासी उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचीही उपस्थिती राहणार आहे. रवींद्र पाठक हे पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेच्या प्रसारासाठी कार्यरत आहेत. त्यांनी श्रीमद् दासबोध, मनोबोध आणि रामचरितमानस या संत साहित्याचा सखोल अभ्यास करून प्रवचने दिली आहेत, तसेच ग्रंथनिर्मितीही केली आहे. कोरोना काळात त्यांनी डिजिटल माध्यमातून ‘रामकथा’चे तब्बल १३०० भाग प्रसारित केले. याशिवाय, त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांच्या पुण्यक्षेत्री नऊ दिवस रामकथा आणि अन्नछत्राचा उपक्रमही यशस्वीपणे राबविला. त्यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना ‘मानस किंकर’ ही उपाधी आणि ‘संत सेवा पुरस्कार’ देऊन गौरविले आहे. ते ‘श्री चैतन्य गोशाळा’च्या माध्यमातून सेवा कार्य करतात. तसेच, ‘रवी इंडस्ट्री’ उद्योगसमूहाच्या माध्यमातून त्यांनी रोजगारनिर्मिती आणि ग्राहक सेवेतही उल्लेखनीय कार्य उभे केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *