Headlines

राजकीय आघाड्या मजबूत होतील, पण पक्ष विलीन होणार नाहीत:वेरुळमधील शिक्षकाचा मृत्यू म्हणजे पोलिसी गुंडशाहीचा कळस- अंबादास दानवे




सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी पूर्णविराम दिला आहे. कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होणार नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसची काँग्रेससोबत केवळ आघाडी असून ती आगामी काळात अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची घेतलेली भेट ही एक सामान्य राजकीय गोष्ट असून, नेत्यांच्या अशा भेटीगाठी नेहमीच होत असतात, असे सांगत त्यांनी या विषयावर फार चर्चा करण्याची गरज नसल्याचे म्हटले.
अंबादास दानवे यांनी वेरुळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावर बोलताना थेट पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. रात्रीच्या वेळी शिक्षकांच्या भागात काही गाड्या आल्या होत्या, ज्यात पोलिस आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते. ‘इतक्या रात्री कोणाकडे आलात?’ असा साधा प्रश्न विचारल्याचा राग आल्याने पोलिसांनी बोरसे यांना बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला असला, तरी हा झटका बेदम मारहाणीमुळेच आल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात ‘नागरगोजे’ नावाचा अधिकारी व्हिडिओ आणि रेकॉर्डवर दिसत असतानाही पोलिसांकडून ‘अज्ञात व्यक्तीं’विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मोठ्या प्रयत्नांनंतर काल रात्री गुन्हा दाखल झाला असून, बोरसे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे दानवे म्हणाले. व्हिडिओ व्हायरल होणाऱ्या शेतकऱ्यांनाच मदत का? अंबादास दानवे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, केवळ त्यांनाच मदत दिली जाते याकडे लक्ष वेधत त्यांनी उर्वरित वंचित शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. व्हिडिओ व्हायरल न झालेल्या गरजू शेतकऱ्यांपर्यंतही सरकारी मदत पोहोचली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे असते तर अशी वेळ आलीच नसती, असे सांगत कृषी विभागाकडून यापूर्वीच शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

अंबादास दानवेंची पोस्ट काय? अंबादास दानवे म्हणाले की, वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत! शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी “हा एक नंबर” म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलिस अधिकारी याच ‘एक नंबर’ला पेढे भरवताना दिसत आहे! ​गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), घटनेच्या वेळी ते पोलिसांसोबत हजर आहेत, त्यांचे रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे; असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी ‘अनोळखी’ कसे काय असू शकतात? हा गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे! पोलिसांची ही उघडी दाबादबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही. तात्काळ कारवाई करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे! असे दानवे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *