Headlines

राज्यातील धरणांत 44% पाणी, मराठवाड्यात सर्वात कमी 25%:धरणांतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा 15% घटला




ऐन पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणसाठ्यात चिंताजनक घट झाली आहे. जलसंपदा विभागाने १४ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, राज्यातील ३०२९ प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४३.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५९.४३ टक्के होता. म्हणजेच एका वर्षात पाणीसाठ्यात जवळपास १५.५० टक्क्यांची घट झाली असून, मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. राज्यातील धरणांची एकूण साठवण क्षमता ४८४८७.०१ दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी उपयुक्त क्षमता ४०,८१९.४९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणांमध्ये केवळ १७,९३२.७४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला तरी दमदार पाऊस न झाल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. पावसाचा लपंडाव असाच राहिल्यास पेरणीवर संकट राज्यात सध्या उपलब्ध ४३.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा हा भविष्यातील संकट ओळखून प्रामुख्याने पिण्यासाठी राखून ठेवावा लागेल. मराठवाडा व नाशिक विभागात पावसाने अशीच दांडी मारल्यास धरणक्षेत्रातील पाणी सिंचनासाठी मिळणे कठीण होईल. याचा थेट फटका खरीप हंगामातील पिकांना बसत असून, दुबार पेरणीचे संकट अनेक जिल्ह्यांत उभे आहे. पुढे जाऊन रब्बी हंगामाचे नियोजनही कोलमडू शकते. शेतकरी आणि प्रशासनासाठीही ही चिंतेची बाब आहे. मराठवाड्यावर पाणीबाणीचे सावट, इतर विभागातही चिंता छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागातील २२९ प्रकल्पांमध्ये सर्वात कमी केवळ २५.५८ टक्के पाणीसाठा उरला आहे. गतवर्षी येथे ४४.३७% पाणी होते. नाशिक विभागात ४०.८७ %, नागपूरमध्ये ३९.८९%, अमरावतीमध्ये ४२.२२ टक्के उपयुक्त साठा आहे. पश्चिम महाराष्ट्रासोबतच कोकण विभागाला दिलासा पुणे विभागातील ७२४ धरणांमध्ये ५१.२६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी येथे ७०.०६ टक्के पाणी होते. कोकणातील १७४ धरणांत सध्या ६२.९३ टक्के पाणीसाठा असून, इतर विभागांच्या तुलनेत या दोन विभागांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *