Headlines

राज्यात पावसाचा हाहाकार!:धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती; सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना बंदी




राज्यातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी नदीनाल्यासह धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अशातच उजनी धरणात देखील मोठ्याप्रमाणत पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर तिकडे भीमा नदीने देखील इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. अशातच नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी शिरल्याचे चित्र असून स्थानिक प्रशासन, पोलिस आणि नगरसेवकांनी रात्री उशिरा या भागातील नागरिकांचे स्थलांतर केले आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमधील भीमा (चंद्रभागा) नदीने 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली असून, सध्या नदीपात्रात 1 लाख 6 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याने पाणी वाळवंट आणि घाटावरून थेट रस्त्यावर येऊ लागले आहे. मात्र, यात एक दिलासादायक बाब म्हणजे उजनी धरणातून होणारा 90 हजारांचा विसर्ग आता कमी करून 75 हजारांवर आणण्यात आला असून, येत्या दोन दिवसांत पुणे आणि सातारा परिसरात पाऊस न पडल्यास पूरस्थितीचा सामना करणाऱ्या पंढरपूरला मोठा दिलासा मिळू शकेल. कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा साताऱ्यात कृष्णा नदीने पुन्हा रौद्ररूप धारण केले असून, लिंब-गोवे परिसरातील ऐतिहासिक कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. नदीचा प्रवाह दुतर्फा झाल्याने मंदिराकडे जाणारा मार्ग, त्याजवळील जुना पूल, लिंबचा पुरातन घाट आणि मर्ढे-आनेवाडी दरम्यानचा पूल पाण्याखाली गेल्याने भाविकांना दर्शनासाठी जाणे अशक्य झाले आहे. एकीकडे धोम-बलकवडी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर दुसरीकडे पावसाचा जोरही कायम असल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा पूरस्थितीचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यावर दरड आणि दगड कोसळण्याचा धोका वाढल्याने पुणे वन विभागाने सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्टीच्या दिवशी किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असली तरी, सुरक्षिततेच्या कारणास्तव आज प्रवेशास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी या काळात सिंहगड परिसरात जाणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढवल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, आज सकाळी ती 29 फुटांवर पोहोचली आहे. शनिवारी कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत सुरुवातीला वेगाने वाढ झाली होती, मात्र दुपारपासून हा वेग मंदावला असून आता केवळ संथ गतीने वाढ होत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नदीच्या पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *