Headlines

राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा:ठाकरे गटातील अनेक जण आमच्या संपर्कात, एकनाथ शिंदे योग्य वेळी ठरवतील – संजय शिरसाट




ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले आहे. या संभाव्य राजकीय भूकंपावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे सूचक विधान केले आहे. “आमच्या संपर्कात सध्या अनेकजण आहेत. जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे, तेव्हा ते एकनाथ शिंदे ठरवतील,” असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट पुढे म्हणाले, “सध्या तरी आमची कोणतीही ऑपरेशन टायगर करण्याची मानसिकता नाही. आम्ही स्वतःहून तसे काही करत नाही आहोत. मात्र, ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे, त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. अनेक जण आमच्या संपर्कात असून, आगामी काही महिन्यांत हे सर्व विरोधक एकत्र राहतील असे मला वाटत नाही.” त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत पुन्हा फूट पडणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे ‘राजकीय पोळी’ राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावर टीका करताना शिरसाट म्हणाले की, त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, रोहित पवार केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी. मुंबईत मराठी न बोलणाऱ्यांना कारवाईचा इशारा मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावर शिरसाट यांनी कडक भूमिका घेतली. ते म्हणाले, “आमदार प्रताप सरनाईक यांनी ज्यांना मराठी येत नाही, त्यांना ती शिकण्यासाठी काही वेळ दिला होता. देशातील इतर अनेक राज्यांमध्ये त्या त्या राज्याची स्थानिक भाषा बोलली जाते, मग मुंबईत मराठी का बोलली जाऊ नये? एवढी सवलत देऊनही जर कोणी ऐकत नसेल, तर ती त्यांची मुजोरी म्हणावी लागेल आणि अशा लोकांवर कडक कारवाई होईलच.” एफडीएच्या कारवाईचे स्वागत, पण जुन्या अधिकाऱ्यांवर संशय अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात भेसळखोरांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचे त्यांनी कौतुक केले, मात्र सोबतच यंत्रणेच्या आधीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिरसाट म्हणाले, “एफडीएच्या या मोठ्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. धाडसी अधिकाऱ्यांना सरकार पूर्ण संरक्षण देईल. मात्र, प्रश्न असा पडतो की आतापर्यंत हे अधिकारी झोपले होते का? आपल्याकडे आधुनिक लॅब का नव्हत्या आणि तपासण्या का रखडल्या होत्या? यावरून काही अधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांसोबत आर्थिक लागेबांधे होते हे उघड होते. आता ही कारवाई कोणत्याही दबावाखाली थांबता कामा नये,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *