![]()
निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकारिणीच्या पत्रात पक्षातील अत्यंत ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावे नसल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून, राष्ट्रवादीत पुन्हा एकदा ‘पडद्यामागे’ काही हालचाली सुरू आहेत का, अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या व्हायरल पत्रावर अनेक राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 29 एप्रिल रोजी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे पत्र समोर आले. या पत्रात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध केली आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रात प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे गायब असल्याचे दिसून आले. पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या या नेत्यांना कार्यकारिणीतून बाहेर ठेवले गेल्याने अंतर्गत बदलांच्या चर्चा सुरू झाल्या. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया चर्चेत या प्रकरणावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल पण सूचक भाष्य केले. ते म्हणाले, “सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय यांनी प्रफुल पटेल व सुनील तटकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घ्यावे की नाही, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मी जेव्हा सुनेत्रा पवारांना भेटेन, तेव्हा एवढ्या वरिष्ठ नेत्यांना कार्यकारिणीत का घेतले नाही, असा प्रश्न नक्कीच विचारेन.” काँग्रेसचा ‘घरभेदी’वरून थेट वार काँग्रेसने या संधीचा फायदा घेत अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, “कदाचित सुनेत्रा पवारांनी ‘घरभेदी’ ओळखले असावेत. अजित पवारांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही विशेष माहिती असेल. पक्ष हडपण्यासंदर्भात ज्या चर्चा सुरू होत्या, त्या कदाचित खऱ्या असतील, म्हणूनच या बड्या नेत्यांना बाजूला सारले असावे.” छगन भुजबळांची सावध प्रतिक्रिया यासंदर्भात बोलताना छगन भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया देत, या विषयावर अधिकचे बोलणे टाळले आहे. भुजबळ म्हणाले, “यासंदर्भात मला पहावे लागेल. अशा गोष्टींची मी मीडियात चर्चा करू इच्छित नाही. ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत, त्यावर मी चर्चा करणे योग्य नाही.” कार्यकारिणीवर सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण व्हायरल झालेल्या या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. माध्यमांमध्ये फिरत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक चूक असून ती लवकरच दुरुस्त करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी या यादीने राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचाली पुन्हा चर्चेत आणल्या आहेत.
Source link
राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीतून जुन्या नेत्यांना वगळले:छगन भुजबळांची सावध प्रतिक्रिया, काँग्रेसचा 'घरभेदी'वरून टोला