![]()
सेवा हाच आपल्या जीवनातील परमधर्म आहे. आपण केलेली सेवा ही ईश्वरप्राप्तीचे साधन ठरते. याच परमधर्माच्या साहाय्याने आपल्याला भगवंतापर्यंत, साधू-संतांपर्यंत पोहोचता येते, असे प्रतिपादन कैलास महाराज चव्हाण (मुंबई) यांनी केले. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप आज, शनिवार, ३१ ऑक्टोबरला, गोपालकाल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी त्यांनी प्रबोधन केले. आपण आपल्या जीवनात जो आचार व विचार अंगीकारला आहे, त्याचे प्रतिबिंब प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येते. धर्म हा अनादी आहे. त्याला काळाचे कोणतेही बंधन नसते. एखाद्या व्यक्तीपासून जो सुरू होतो, त्याला आपण पंथ म्हणतो. सनातन परंपरेची जोपासना संतांनी आपल्या परंपरेतून केली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे तत्त्व राष्ट्रसंतांनी आपल्याला सांगितले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, सर्व संत, शैव परंपरा, वैष्णव परंपरा यांनी हेच तत्त्व आपल्याला शिकविले. सर्व संतांनी हेच सांगितले असताना आपण आपल्या विचारांमध्ये मतभेद का ठेवावेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पुण्यतिथी महोत्सवातील मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातील शिस्त व सेवा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. लाखोंचा जनसमुदाय असूनही सगळेजण अगदी एका शिस्तीत, एका रांगेत बसले होते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज हे एकमेकांपासून वेगळे आहेत का? असा प्रतिप्रश्न करून, हे महाराज आमचे, ते महाराज तुमचे, तुम्ही त्यांचे अनुयायी असाल… असा भेद करत राहिलो, तर समन्वय कसा साधणार? संतांनी कधीही असा भेद केला नाही. ज्या-ज्या लोकांनी इतर धर्मांवर, पंथांवर, संप्रदायांवर टीका केली, ते कधीही मोठे झाले नाहीत. ते मर्यादितच राहिले. शेवटी त्यांचा विचार लोप पावला. आपल्याला संकुचित राहायचे नसून व्यापक विचार करायचा आहे. आपण व्यापकतेच्या दिशेने आपले आचार-विचार घडविले पाहिजेत. पुण्यतिथी महोत्सवात आल्यावर जी अनुभूती येते, ती शब्दांत सांगण्यासारखी नाही. तिचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. जशी पंढरपूरची व देहूची वारी आहे, तसाच अनुभव या गुरुकुंज वारीचा आहे. यावेळी लक्ष्मणदास काळे महाराज, सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. गोपालकाल्याचे कीर्तन समाधान महाराज शर्मा यांनी केले. श्रीगुरुदेव प्रकाशन विभागाने काढलेला श्रीगुरुदेव मासिकांचा विशेषांक तसेच श्रीगुरुदेव दिनदर्शिका व बाळासाहेब तोरस्कर लिखित ‘शब्द झेलताना’ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचार प्रमुख गोपाल कडू यांनी केले. आभार अमोल बांबल यांनी मानले. गोपालकाला तयार करण्यासाठी व त्याचे व्यवस्थित वितरण करण्यासाठी श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी, श्रीगुरुदेव मानवसेवा छात्रालयाचे विद्यार्थी, श्रीगुरुदेव विद्यामंदिरातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. आरती व राष्ट्रवंदनेने गोपालकाल्याची सांगता करण्यात आली. या पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपीय प्रसंगी संचालक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे, सरचिटणीस जनार्दन बोथे, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, प्रचार प्रमुख गोपाल कडू, कार्यकारिणी सदस्य दामोदर पाटील, ॲड. दिलीप कोहळे, पौर्णिमा सवाई, गणेश जवंजाळ, लक्ष्मणराव गमे, रामदास देशमुख, डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल तसेच जीवन व आजीवन प्रचारक उपस्थित होते. या मान्यवरांचा सत्कार यावेळी रुख्मिणी माता संस्थान, कौंडण्यपुरचे विश्वस्त अशोक पवार, सयाजी महाराज, मायबाई संस्थान, आर्वीचे श्रीकृष्ण गिरीधर, नाना महाराज (परसवाडा), नागार्जुन टेकडीचे महंत कैलास पुरी महाराज (रामटेक), लहानुजी महाराज संस्थान, टाकरखेडचे बाळासाहेब पावडे, माजी आमदार दादारावजी केचे, अच्युत महाराज संस्थानचे अनिल सावरकर तसेच सुरेश शिंदे, मानकर स्वामी व पत्रकार हेमंत निखाडे यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
Source link
राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा गोपालकाल्याच्या कीर्तनाने समारोप:सेवा हीच ईश्वर प्राप्तीचे साधन- कैलास चव्हाण