Headlines

राहुल गांधींचा फोन अन् बोंद्रेंचा यु-टर्न:अखेरच्या क्षणी राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द, म्हणाले- सर्व काही गमावले तरी काँग्रेससोबतच राहीन




बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा चेहरा आणि चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राज्य राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. स्वतः बोंद्रे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तबही केले होता. मात्र, या राजकीय नाट्यात थेट दिल्लीतून सूत्रे हलली आणि राहुल गांधी यांनी फोन करून मनधरणी केल्यानंतर बोंद्रे यांनी आपला निर्णय मागे घेतला. भाजपच्या उंबरठ्यावरून बोंद्रे माघारी फिरल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा जिल्ह्यातच बोंद्रे यांनी बंडाचे निशाण उभारल्याने काँग्रेससह प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का मानला जात होता. बोंद्रे भाजपमध्ये गेले असते, तर जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नुकसान झाले असते. त्यामुळे हे बंड रोखण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने पावले उचलली. राहुल गांधींचा फोन अन् भावूक संवाद काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी स्वतः राहुल बोंद्रे यांना फोन लावला. कोणत्याही दबावाखाली येऊन घाईघाईत निर्णय घेऊ नका; कुठेही जाणे ही तुमची मोठी चूक ठरेल. तुमच्या सर्व परिस्थितीची आम्हाला कल्पना असून पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी दिला. तसेच तुम्ही पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिला आहात आणि काँग्रेसला तुमची गरज आहे, असे सांगत त्यांनी बोंद्रे यांना निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले. राहुल गांधींनी स्वतः दखल घेतल्याने प्रभावित झालेल्या बोंद्रे यांनी आपला निर्णय तात्काळ मागे घेतला. तुम्ही माझी दखल घेऊन फोन केलात, हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे. आता सर्व काही गमावले तरी मी काँग्रेस आणि तुमच्यासोबतच राहीन, असा शब्द बोंद्रे यांनी या वेळी राहुल गांधींना दिला. श्वेता महालेंच्या मध्यस्थीची चर्चा अन् फसलेला डाव चिखली मतदारसंघातील भाजप आमदार श्वेता महाले यांनी बोंद्रे यांचा दोनदा पराभव करत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. 2024 च्या निवडणुकीपासूनच बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू होत्या. या वेळी श्वेता महाले आणि त्यांचे पती विद्याधर महाले यांनी या प्रवेशासाठी मध्यस्थी केल्याचे बोलले जात होते. आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य राजकीय प्रतिस्पर्ध्यालाच आपल्या गोटात खेचण्याचा किंवा राजकीयदृष्ट्या निष्प्रभ करण्याचा हा डाव होता; मात्र राहुल गांधींच्या मध्यस्थीमुळे भाजपचा हा डाव तूर्तास फसला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *