Headlines

राहुल गांधींच्या आंदोलनामागे एलन मस्कचा पैसा!:संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी आणण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र; परिणय फुके यांचा आरोप




“काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीकडून देशभरात सुरू असलेली आंदोलने ही केवळ राजकीय नसून भारतामध्ये अराजकता पसरवण्याचे एक मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे. देशातील संविधानिक संस्थांविषयी संभ्रम निर्माण करून जनतेच्या मनात संविधानाविरोधात मत तयार करायचे आणि मूळ संविधान हटवून कम्युनिस्ट विचारसरणी आणायची, हाच राहुल गांधींचा खरा अजेंडा आहे. मागच्या दोन महिन्यांतील आंदोलनांच्या घडामोडी पाहिल्या तर या सर्व आंदोलनामागे उद्योगपती एलन मस्क यांचा पैसा असून, राहुल गांधी हे चीनसह परदेशी अब्जाधीशांचे दलाल म्हणून काम करत आहेत,” असा खळबळजनक आरोप भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना परिणय फुके यांनी दिल्लीतील सीजेपीचे आंदोलन, महाराष्ट्रातील विविध आंदोलने, एलन मस्कचे ट्वीट्स, स्टारलिंक प्रकल्पाला भारताने दिलेला नकार आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सविस्तर भाष्य केले. संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी आणण्याचा डाव! राहुल गांधींच्या आंदोलनावर ताशेरे ओढताना आमदार फुके म्हणाले, “राहुल गांधींचा उद्देश संविधानाचे रक्षण करणे नसून लोकांच्या मनात संविधानाबद्दल शंका निर्माण करणे हा आहे. मी आधीही स्पष्ट केले होते की, संविधानाची चौकट मोडून काढत देशात कम्युनिस्ट विचारसरणी आणण्याचा डाव रचला जात आहे.” देशभरात एकापाठोपाठ आंदोलने का? “गेल्या दोन महिन्यांतील घडामोडींचा क्रम पाहिला तर हे स्पष्ट दिसते. आधी नीट परीक्षेचे आंदोलन, त्यानंतर राहुल गांधींचे दिल्लीतील आंदोलन, महाविकास आघाडीचे आंदोलन, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची आंदोलने आणि त्यानंतर रोहित पवारांचे एमपीएससी आंदोलन… ही सर्व आंदोलने एकाच वेळी सुरू करून देशात जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करण्याचे पद्धतशीर काम केले जात आहे.” एलन मस्कचा पैसा आणि स्टारलिंकचे कनेक्शन; भारत कधीही झुकणार नाही या आंदोलनामागे विदेशी उद्योगपतींचा हात असल्याचा दावा करत फुके म्हणाले, “उद्योगपती एलन मस्क यांनी ज्याप्रमाणे इतर काही देशांमध्ये अराजकता निर्माण करून आपल्या उद्योगांसाठी दरवाजे उघडले, तोच प्रयत्न भारतात सुरू आहे. मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ प्रकल्पाला केंद्र सरकारने स्पष्ट नकार दिला, कारण त्यातून देशाच्या सुरक्षेशी तडजोड (Security Clearance issues) होत होती. देशाचे मॅन्युफॅक्चरिंग, देशी उद्योगपती आणि बाजारपेठ सुरक्षित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे.” आंदोलनामागे विदेशी फंडिंगचा संशय “स्टारलिंकला नकार दिल्यानंतर लगेच मस्क यांचे ट्वीट येणे आणि त्यानंतर राहुल गांधी, अभिजीत दिपके, ठाकरे बंधू यांची आंदोलने वेगाने सुरू होणे, या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या नेत्यांच्या मागे 100 टक्के एलन मस्कचा पैसा आहे. राहुल गांधी हे चीन आणि परदेशी बड्या उद्योगपतींचे दलाल आहेत. मात्र, अशा दबावापुढे भारत देश कधीही झुकणार नाही आणि वाकणार नाही.” अभिजीत दिपकेंना अटकेचे भांडवल करायचे होते सीजेपीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या दिल्लीतील अटकेवर त्यांनी भाष्य केले, “दिल्ली पोलिसांनी समोर आणलेल्या व्हिडिओतून सत्य स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिपके यांना सांगितले होते की, तुमच्या आजीचे निधन झाले आहे, त्यामुळे तुम्ही अंत्यविधीसाठी जाऊ शकता. परंतु ते स्वतःहून तिथे थांबले. त्यांना आजीच्या मृत्यूचे आणि स्वतःच्या अटकेचे निव्वळ राजकीय भांडवल करायचे होते. हे संपूर्ण प्रकरण केवळ लोकशाही व संविधानावर प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी राजकीय हेतूने रंगवले गेले.” MPSC आंदोलन स्थगितीचे स्वागत; विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची खंत पुण्यातील एमपीएससी आंदोलन मागे घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. “विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन समंजसपणा दाखवला, हे स्वागतार्ह आहे. मात्र, या राजकीय आंदोलनात विद्यार्थ्यांचे 15 ते 20 मौल्यवान दिवस वाया गेले. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. स्वतःचे करिअर धोक्यात घालून विद्यार्थ्यांनी राजकीय हेतूने प्रेरित आंदोलनांमध्ये सामील होऊ नये.” 124 सनदी अधिकाऱ्यांचा पाठिंबा “निवडणूक आयोगाच्या बाजूने केवळ 124 अधिकारीच नाही, तर देशातील सर्व प्रामाणिक आयएएस, आयपीएस अधिकारी उभे राहतील. निवडणूक प्रक्रियेत अगदी मुख्य सचिवापासून ते शिपायापर्यंतची लाखो लोकांची यंत्रणा अहोरात्र काम करते. या संपूर्ण व्यवस्थेलाच बदनाम करण्याचे पाप राहुल गांधी करत आहेत.” काळ्या फिती बांधून स्वतःचे काळे कारनामे झाकतात शिवसेना ठाकरे गटाने (UBT) पुकारलेल्या आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले, “ज्यांनी स्वतःच्या कार्यकाळात संविधानाची पायमल्ली केली, तीच मंडळी आज काळ्या फिती लावून स्वतःचे काळे कारनामे झाकण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत.” शेवटी भाजपमधील जुन्या-नव्या समन्वयाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भाजप ही एका कुटुंबासारखी संघटना असून, जुन्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘सबका साथ’ या भावनेतूनच पक्ष पुढे जात राहील. ——————————————————— हेही वाचा… CJPचा दिल्ली पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम: म्हणाले- परवानगी न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करणार; पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा अर्धवट व्हिडिओ दाखवला- दिपके कॉकरोच जनता पार्टीने दिल्ली पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची तारीख मिळाली नाही, तर पुन्हा आंदोलन करू, असे त्यांनी म्हटले आहे. CJPचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरव दास सोमवारी आंदोलनाची परवानगी मागण्यासाठी पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात पोहोचले होते. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *