![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सध्या अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना काहीसा विराम मिळाल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर पुकारलेल्या ‘न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चा’वरून पक्षांतर्गत मतभेद समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी रोहित पवार यांच्या मोर्चाला जाहीरपणे पाठिंबा दर्शविल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे वेधले गेले आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली 4 डिसेंबरपासून या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात होणार आहे. विदर्भातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र शेगाव येथून सुरू होणारा हा मोर्चा 9 डिसेंबर रोजी नागपूर येथे पोहोचणार असून, हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर धडकणार आहे. मात्र, या आंदोलनाच्या तयारीदरम्यान पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून विदर्भातील पदाधिकाऱ्यांना मोर्चात सहभागी न होण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे रोहित पवार यांच्या आंदोलनाला पक्षांतर्गतच मर्यादा आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली होती. अमर काळेंची नियोजन बैठकीला उपस्थिती या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान खासदार अमर काळे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चाच्या नियोजनासाठी नागपूर येथे बैठक झाली. या बैठकीला अमर काळे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोर्चाला पाठिंबा दर्शविला. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमर काळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, शेतकरी आणि शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोर्चाच्या नियोजन बैठकीस नागपूर येथे उपस्थित राहिलो. विदर्भातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या आंदोलनाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार या मोर्चाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने मांडण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा, प्रलंबित कर्जमाफी, पीकविमा भरपाई, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि शेतीमालाला योग्य हमीभाव मिळण्याचा प्रश्न या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असणार आहे. याशिवाय शेतमजुरांच्या मूलभूत समस्या आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीकडेही सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. 4 डिसेंबर रोजी शेगाव येथून सुरू होणारा मोर्चा विविध मार्गांवरून प्रवास करत 9 डिसेंबरला नागपूरमध्ये दाखल होईल. याच काळात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याची रणनीती रोहित पवार यांनी आखली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतमजुरांच्या मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही अमर काळे यांनी व्यक्त केला आहे. पक्षातील सूचनांमुळे रोहित पवारांच्या आंदोलनाबाबत संभ्रम दरम्यान, रोहित पवार यांनी नागपूरमध्ये विदर्भातील पक्षाच्या ग्रामीण आणि शहर जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून संबंधित पदाधिकाऱ्यांना प्रदेश कार्यालयाच्या सूचनांनुसारच काम करण्यास सांगण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने समोर आली होती. तसेच रोहित पवार यांच्या कोणत्याही आंदोलनात सहभागी न होण्याच्या सूचना दिल्याचेही वृत्त होते. त्यामुळे रोहित पवार यांच्या मोर्चाच्या तयारीला पक्षातीलच काही नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत अमर काळे यांनी नियोजन बैठकीला उपस्थित राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना आंदोलनापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या जात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काळे यांची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. त्यांच्या पोस्टमधून ते या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. एकीकडे पक्षातील वरिष्ठ स्तरावरून वेगळ्या सूचना दिल्या जात असल्याची चर्चा, तर दुसरीकडे खासदार अमर काळे यांचा रोहित पवारांच्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आता रोहित पवारांच्या या मोर्चाला विदर्भातील आणखी कोणते नेते आणि पदाधिकारी पाठिंबा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा…. शंभूराज देसाईंनी महायुतीचा धर्म पाळला नाही:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या अर्जुन काळेंना पाडण्यासाठी प्रयत्न केले – जयकुमार गोरे यांचा गंभीर आरोप सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीनंतर ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे आणि पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गोंदवले येथे बोलताना जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या एका संचालकाला पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करत, हे शंभूराज देसाई यांना शोभते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच जिल्हा बँकेतील यापूर्वीचे कथित गैरव्यवहार बाहेर काढण्याचा इशारा देत 100 कोटींचे सॉफ्टवेअर आणि 100 कोटींचे लॅपटॉप कुठे गेले, याचा शोध घेणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…..
Source link
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला पक्षातूनच विरोधाची चर्चा:खासदार अमर काळेंचा मात्र पाठिंबा