![]()
क्रांतिवीर वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या जीवनावर आधारित भव्य मराठी चित्रपटाची निर्मिती आता लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक पाठबळाअभावी रखडलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कथा लेखक व निर्माते सुनील रंगनाथ भोसले यांनी केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, दिनकर सकट, देवराव साठे, संतोष साळवे, मच्छिंद्र थोरात, एड. प्रदीप सकट, अश्विनी खराडे आणि अनंत जोशी उपस्थित होते. यावेळी या चित्रपटाची सविस्तर माहिती देण्यात आली. अदिल्यानगर येथील सुनील रंगनाथ भोसले यांनी या चित्रपटाची संकल्पना मांडली आहे. २०२३ पासून या प्रकल्पावर संशोधन, ऐतिहासिक संदर्भांचे संकलन, कथा, पटकथा आणि संवादलेखनाचे काम पूर्ण झाले आहे. चित्रीकरणासाठी ऐतिहासिक स्थळांची पाहणी, कलाकारांशी प्राथमिक चर्चा आणि तांत्रिक नियोजनही अंतिम टप्प्यात आहे. गेल्या तीन वर्षांत अनेक निर्माते, उद्योगपती आणि गुंतवणूकदारांशी चर्चा झाली. सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला; मात्र चित्रपटाचा विषय लहुजी वस्तादांच्या जीवनावर आधारित असल्याचे समजल्यानंतर काही संभाव्य निर्मात्यांनी माघार घेतल्याने प्रकल्पाचे चित्रीकरण सुरू होऊ शकले नाही. आजवर लहुजी वस्तादांच्या शिष्यांवर आणि त्यांच्या प्रेरणेने घडलेल्या अनेक समाजसुधारक व क्रांतिकारकांवर चित्रपट व साहित्य निर्माण झाले आहे. मात्र, लहुजी वस्तादांच्या जीवनावर मोठ्या पडद्यावरील चित्रपट झालेला नाही. ही ऐतिहासिक उणीव भरून काढण्यासाठी हा चित्रपट ‘समाजाचा चित्रपट’ म्हणून साकारला जाणार आहे. लहुजी वस्तादांनी जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रनिर्मितीचे कार्य केले. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यासह अनेकांना प्रेरणा दिली. या चित्रपटात क्रांतिवीर उमाजी नाईक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, धोंडीबा देसाई, सत्तू नाईक, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मुन्शी गफार बेग, सखाराम यशवंत परांजपे आणि मोरोपंत विठ्ठल बाळवेकर यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचाही समावेश असणार आहे. हा चित्रपट केवळ एक चरित्रपट नसून, महाराष्ट्र आणि भारताच्या सामाजिक व क्रांतिकारी इतिहासाला अभिवादन करणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Source link
लहुजी साळवे यांच्या जीवनावर चित्रपट लोकसहभागातून:आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या प्रकल्पासाठी समाजाला आवाहन