Headlines

सौरभ गाडगीळ यांच्या 'चुझिंग गोल्ड' पुस्तकाचे प्रकाशन:3 दुकानांवरून 80 शाखांपर्यंत व्यवसाय वाढवण्याचा अनुभव कथन




प्रसिद्ध सराफ सौरभ गाडगीळ यांच्या ‘चुझिंग गोल्ड’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलताना गाडगीळ यांनी आपला व्यावसायिक प्रवास आणि त्यातील अनुभव कथन केले. वारसा केवळ असण्यापेक्षा त्याचा वापर आपण कशाप्रकारे करतो, हे महत्त्वाचे असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अभिनेते प्रसाद ओक यांनी त्यांची मुलाखत घेतली. गाडगीळ यांनी सांगितले की, कोणताही वारसा हे दुहेरी शस्त्र असते आणि लोकांच्या विविध अपेक्षांचे दडपण असते. त्यात स्वतःचे स्थान निर्माण करावे लागते. २०१२ मध्ये त्यांचे काका व्यवसायातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याकडे केवळ तीन दुकाने होती. मात्र, आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे त्यांनी नुकसानीतून अनुभव घेत पुढे वाटचाल केली. या अनुभवांच्या जोरावर त्यांनी ८० दुकाने निर्माण केली. ‘चुझिंग गोल्ड’ या पुस्तकात गाडगीळ यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचा अनुभव समाविष्ट आहे. पीएनजी ज्वेलर्ससोबत ते जोडले गेले, तेव्हाची आणि सध्याची परिस्थिती याबाबत माहिती देण्यात आली आहे. दाजीकाका गाडगीळ यांनी त्यांना शिकवलेल्या विविध गोष्टी आणि निर्णय घेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहितीही पुस्तकात आहे. त्यांनी व्यवसाय छंद म्हणून नव्हे, तर एक गंभीर व्यवसाय म्हणून केला. पूर्वी त्यांचे एकच दुकान होते, सुमारे २० कोटींचा व्यवसाय होता आणि १० ते १२ कर्मचारी कार्यरत होते. आज त्यांच्या व्यवसायाच्या ८० शाखा असून, दहा हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल आहे. सध्या चार हजार कर्मचारी त्यांच्यासोबत काम करत आहेत. या पुस्तकात त्यांना कुटुंब, कर्मचारी आणि मित्रांकडून मिळालेली साथ, तसेच त्यातून शिकलेले धडे यांचा अनुभव दिला आहे. नवीन व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, दडपणाच्या परिस्थितीत निर्णय कसे घ्यावेत, नुकसान कसे टाळावे, नुकसानग्रस्त परिस्थिती कशी हाताळावी, यशाची कारणे, आव्हानांना कसे सामोरे जावे आणि व्यवसाय वाढीसाठी काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी अभिनेते प्रसाद ओक म्हणाले की, विश्वासाच्या जोरावर सौरभ गाडगीळ यांचा व्यवसाय वाढला आहे. हा विश्वासच त्यांचा महत्त्वाचा दागिना असून, अनेक हितचिंतकांचा त्यावर विश्वास आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *