Headlines

लाखो वारकऱ्यांच्या लाडक्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन:उद्यापासून 3 दिवस दर्शन बंद, मूर्तीवर होणार रासायनिक लेपन




राज्यभरातील वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) रासायनिक लेपनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामासाठी 23 सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस मंदिरातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. आज, 22 सप्टेंबर रोजी शेजारतीनंतर मूर्ती संवर्धनाच्या प्राथमिक कामाला सुरुवात होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष लेपन प्रक्रिया केली जाणार आहे. मूर्तींच्या झीजेमुळे संवर्धनाचा निर्णय विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः विठ्ठलाच्या चरणांच्या भागाची झीज अधिक झाल्याने मूर्तीच्या दीर्घकालीन संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. दरवर्षी लाखो भाविक विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करून दर्शन घेतात. त्यासोबत अभिषेक, वातावरणातील आर्द्रता आणि तापमानातील बदल यांचाही दगडावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. ही झीज आणखी वाढू नये आणि मूर्ती सुरक्षित राहावी, यासाठी पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे कामाला झाला विलंब मूर्तीवर रासायनिक लेपन करण्याच्या प्रक्रियेला काही भाविकांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आषाढी एकादशीपूर्वी प्रस्तावित असलेली ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. या प्रकरणामुळे लेपनाच्या कामाला जवळपास तीन महिन्यांचा विलंब झाला. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याने आता या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ पंढरपुरात दाखल झाले असून निर्धारित कालावधीत मूर्तीचे संवर्धन करण्यात येणार आहे. आधी मूर्तीची सफाई, त्यानंतर झिजलेल्या भागाचे संवर्धन मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांच्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी रात्री शेजारतीनंतर मूर्तीची प्राथमिक सफाई केली जाणार आहे. त्यानंतर 23 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष संवर्धनाच्या कामाला सुरुवात होईल. मूर्तीच्या ज्या भागाची झीज झाली आहे, त्या ठिकाणी मूर्तीच्या मूळ दगडाशी सुसंगत असलेल्या दगडाची भुकटी वापरून झिजलेला भाग भरून काढण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर मूर्तीवर नैसर्गिक रसायनांच्या माध्यमातून संरक्षक लेपन करण्यात येईल. विठ्ठलाच्या चरणांची झालेली झीज अधिक असल्याने या भागावर विशेष काम करावे लागणार आहे. झिजलेले भाग भरल्यानंतर त्यावर संरक्षक थर दिल्याने भविष्यातील झीज कमी करण्यास मदत होईल. ‘वज्रलेप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेचा आधुनिक प्रकार मूर्तीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या या प्रक्रियेला पारंपरिक भाषेत ‘वज्रलेप’ असे म्हटले जाते. मात्र, सध्याच्या पुरातत्त्वीय संवर्धन पद्धतीत मान्यताप्राप्त आधुनिक रासायनिक संरक्षक पदार्थांचा वापर केला जातो. पुरातत्त्व विभागाचे निवृत्त उपसंचालक आणि रसायन तज्ज्ञ विलास पुनीराज यांच्या माहितीनुसार, या प्रक्रियेत इपॉक्सी राळ, दगडाची भुकटी आणि पाणी न झिरपणारे सिलिकॉन आधारित पदार्थ यांचा वापर केला जाऊ शकतो. या प्रक्रियेचा उद्देश मूर्तीला नवीन स्वरूप देणे नसून तिची झालेली झीज नियंत्रित करणे आणि मूळ स्वरूपाचे दीर्घकाळ संरक्षण करणे हा आहे. तीन दिवस दर्शन बंद राहणार संवर्धनाचे काम मूर्तीच्या अगदी जवळून आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केले जाणार असल्याने या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे पंढरपुरात दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांनी या तीन दिवसांच्या कालावधीची नोंद घेऊन नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. अनेक वर्षांपासून भाविकांकडून होणारा स्पर्श, अभिषेक आणि वातावरणातील बदल यामुळे मूर्तीची झीज होत असल्याने आता पुरातत्त्व तज्ज्ञांकडून शास्त्रीय पद्धतीने ही झीज नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हेही वाचा… धार्मिक सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी:ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ध्वनी प्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या सुमोटो जनहित याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्याचे तोंडी निर्देश दिले. तसेच मिरवणुकांमध्ये आवाज वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरसारख्या उपकरणांवरही बंदीचे निर्देश देण्यात आले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *