![]()
चांदूर रेल्वे शहरात स्मशानभूमीसाठी कापलेली झाडे परस्पर एका कंत्राटदाराला विकल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित यंत्रणेला जाब विचारला जात आहे. गेल्या आठवड्यापासून शहराच्या विविध भागांत झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू आहे. विजेच्या तारांना अडथळा होऊ नये आणि गणेश विसर्जनाच्या वेळी वाहनांना अडचण येऊ नये, यासाठी हे काम करण्यात आले. यातून मिळणारी लाकडे स्थानिक स्मशानभूमीला दिली जातील, असा ठराव नगरपालिकेने केला होता. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच घडले. आवश्यक छाटणीच्या नावाखाली मोठ्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोडणी करण्यात आली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या दाव्यानुसार, आतापर्यंत सुमारे २५ झाडे तोडण्यात आली आहेत. तोडलेली झाडे स्मशानभूमीत पोहोचली नाहीत, उलट ती थेट व्यापाऱ्याला विकल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. आतापर्यंत सुमारे आठ ते दहा ट्रक लाकूड जमा झाले आहे. या लाकडांची कुठेही नोंद ठेवण्यात आली नाही. कोणाच्या आदेशाने या लाकडांची विल्हेवाट लावण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. झाडांची छाटणी करताना नियमांचे आणि आवश्यक परवानग्यांचे पालन झाले का, याची चौकशी करण्याची मागणी चांदूर रेल्वेचे नागरिक करत आहेत. झाडांची एकूण संख्या, तोडलेल्या लाकडांचा हिशेब, त्यांची वाहतूक आणि विल्हेवाट याची माहिती अधिकाऱ्यांनी सार्वजनिक करावी, अशी मागणीही पुढे आली आहे. या प्रकरणाबाबत चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्या म्हणाल्या, “झाडे वाचवण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. जर प्रशासनच नियमांचे उल्लंघन करत असेल, तर ते गंभीर आहे. लाकडांची विल्हेवाट लावताना पारदर्शकता का राखली नाही, याची चौकशी केली जाईल. दोषी अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.”
Source link
स्मशानभूमीसाठी कापलेली झाडे कंत्राटदाराला विकली:चांदूर रेल्वे नगरपालिकेत गंभीर आरोप; नागरिकांकडून चौकशीची मागणी