![]()
वडवणी तालुक्यातील रुई पिंपळ्यातील सोना फाटा ते खडकी रस्त्यावर असलेल्या बाळराजे कन्स्ट्रक्शनच्या सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बाल कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजता घडली. घटना घडताच प्लँटवरील सर्व कर्मचारी पळून गेले. त्यामुळे मृतदेह मिक्सरमध्ये ७ तास मशीनमध्ये अडकून पडला होता. सोन्नाखोट्टा ते देवळा यारस्त्याच्या कामासाठी रुई (पिंपळा) येथे आर.एम.सी.प्लँट उभारला आहे. अमोल मच्छिंद्र जावळे (१६, रा.खंडोबाचीवाडी, खडकी, ता. वडवणी) हा बालकामगार या प्लांटमध्ये कामाला होता. गुरुवारी दुपारी अचानक अमोल मिक्सरमध्ये पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच प्लांटवरील सर्व कर्मचारी पळून गेले. त्यामुळे घटना उशिरा समोर आली. मिक्सरचा ऑपरेटरही नसल्याने ७ तास मृतदेह अडकून राहिला. सायंकाळी उशिरा तो बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलिस उपनिरीक्षक शाम गायकवाड,पोलिस अंमलदार हनुमंत कप्पे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नवनाथ उगलमुगले, सहाय्यक फौजदार आदिनाथ तांदळे, पोलिस हवालदार भास्कर राऊत,पोलिस अंमलदार आमेर सय्यद, विश्वजित मुंडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोषींवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गंभीर दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित मृतदेह स्वीकारण्यास नातेवाइकांचा नकार दुपारी दोन वाजता घडलेल्या घटनेनंतर मृतदेह मिक्सरमध्ये अडकून पडलेला होता. तो रात्री ९ वाजता बाहेर काढला. पोलिस पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला . मात्र संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार नातेवाईकांनी दिला. उशिरापर्यंत मृतदेह स्वीकारला नव्हता. वाहनांची वर्दळ वाढल्याने दुर्घटनेचे बिंग फुटले घटना घडल्यानंतर प्लँटवरील काही कामगार घटनास्थळावरून पसार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.दरम्यान, काही वाहनांची घाईघाईने ये-जा सुरू असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संशय आल्याने नागरिकांनी प्लँटकडे धाव घेतली. तेथे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले.
Source link
वडवणीची घटना:सिमेंट मिक्सरमध्ये पडल्यामुळे 16 वर्षीय बालकामगार ठार, कामगार पळून गेल्याने मृतदेह मशीनमध्ये ७ तास अडकला