Headlines

वडिलांचे बंड, पण लेकीची निष्ठा 'मातोश्री'सोबत:संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर कन्या राजोलच्या पोस्टमुळे राजकीय संभ्रम!




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असतानाच, आता ईशान्य मुंबईत एका नव्या कौटुंबिक आणि राजकीय नाट्याने जन्म घेतला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटाची वाट धरलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडवून दिली आहे. वडील गेले तरी लेक ठाकरेंच्या पक्षातच राहणार का? या प्रश्नाने संभ्रमात टाकले आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांची मुलगी राजुल पाटील यादेखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शिंदे गटात प्रवेश करणार, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. मात्र, शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत राजुल पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली. या एका पोस्टमुळे ईशान्य मुंबईच्या राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या संदर्भात राजुल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्येही त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हुलकावणी अन् बंडखोरी संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीपूर्वी पडद्यामागे घडलेल्या नाट्यमय घडामोडी आता समोर आल्या आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ची कुणकुण लागताच १४ जून रोजी ‘मातोश्री’वर तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला संजय दिना पाटील उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यांत डोळे घालून “मी शेवटपर्यंत तुमच्यासोबतच राहीन,” अशी ग्वाही दिली होती. खासदार फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतरही संजय दिना पाटील आपण कुठेही गेलो नसून ठाकरे गटातच असल्याचा दावा करत पक्षाची दिशाभूल करत राहिले. संसदीय दलाच्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे नेत्यांनी थेट बैठकीच्या ठिकाणाहूनच पाटील यांना फोन लावला. त्यावर, “मी विमान पकडले असून थोड्याच वेळात दिल्लीतील बैठकीला पोहोचतोय,” असे खोटे आश्वासन त्यांनी दिले. शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाला अंधारात ठेवून हुलकावणी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांची ही कृती पक्षशिस्तीचा भंग करणारी ठरल्याने, अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीने त्यांना अधिकृतपणे ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. आता वडिलांच्या या बंडखोरीवर लेक राजुल पाटील नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप; कष्टावर पाणी फिरवल्याची भावना दरम्यान, भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत संजय दिना पाटील यांनी महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर अनपेक्षित आणि ऐतिहासिक विजय मिळवला होता. शिवसैनिकांनी उन्हातान्हात फिरून पाटील यांच्यासाठी प्रचार केला होता. या जोरावर गुजराती-मारवाडी मतदारांचे प्राधान्य आणि भाजपची पारंपरिक व्होटबँक भेदून या मतदारसंघात विजय मिळवला होता. या विजयानंतर ठाकरे गटाने त्यांच्या कन्या राजुल पाटील यांनाही महापालिका निवडणुकीत उमेदवारी देऊन सन्मान केला होता. असे असतानाही संजय दिना पाटील यांनी थेट शिंदे गटात जाणार असल्याने ईशान्य मुंबईतील निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *