![]()
शहरातील वृंदावन नगर परिसरात लग्नाचा मंडप काढताना लोखंडी पाईप ११ केव्ही उच्चदाब विजवाहिनीच्या संपर्कात आल्याने २७ वर्षीय मंडप व्यावसायिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे येथील ऋषीकेश कैलास मत्सागर (२७) हा शनिवारी सायंकाळी मंडप काढण्यासाठी वृंदावन नगर येथे गेला होता. काम सुरू असताना लोखंडी पाईपचा वरून गेलेल्या उच्चदाब तारेला स्पर्श झाला. त्यामुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसून तो जागीच कोसळला. स्थानिकांनी मदतीचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर शिवरे येथील ग्रामस्थांनी वणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. नियमानुसार वाहिन्या सुमारे ३० फूट उंचीवर असणे अपेक्षित असताना काही ठिकाणी त्या केवळ १२ ते १५ फूट उंचीवर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. सहायक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेच्या चौकशी आदेश ^वणी येथील घडलेली घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ अधिकारी व तांत्रिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पाहणी करून संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहे. दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. प्राथमिक तपासानंतर आवश्यक त्या तांत्रिक व सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येतील. – धनराज ठेपणे, सहाय्यक अभियंता, महावितरण
Source link
वणीत मंडप काढताना उच्चदाब वाहिनी धक्क्याने तरुणाचा मृत्यू:तारा 15 फुटांवर; संतप्त ग्रामस्थांचा महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप