Headlines

वनखात्याच्या आदेशाला केराची टोपली:तारळी धरणावरील अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरूच




तारळी धरणातील अदानीच्या जलविद्युत प्रकल्पाचे (अदानी पंप स्टोरेज हाऊस) काम तातडीने थांबवण्याचा वनखात्याचा आदेश ही चक्क फसवणूक असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आदेशानंतर सुद्धा जलविद्युत प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरूच असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. तारळी धरणावर परवा वनप्रेमींनी आंदोलन केल्यानंतर सातारा वन विभागाच्या पाटण उपविभागाने आदानीच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम तातडीने थांबवण्याचा आदेश पारित केला होता. तारळी धरणावरील या जलविद्युत प्रकल्पाचे काम केवळ एकच दिवस बंद ठेवून रात्रंदिवस पुन्हा जोरात काम सुरू असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले आहे. वन विभागाचा कामाच्या स्थगितीचा आदेश असताना सुद्धा शेकडो डंपर, जेसीबी व मोठमोठ्या यंत्राच्या साह्याने आज ही प्रकल्पाचे काम सुरू असल्याने वनखात्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे असेच दिसून येत आहे. काम बंद करण्याचा आदेश, पण कोणतीही कृती सातारा वन विभागाकडून नाही काम थांबवण्याच्या बाबतीत केवळ कागदोपत्री आदेश असल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ आदेश काढून त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही कृती सातारा वन विभागाने केली नाही. हा प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात येत असताना सुद्धा मोठ मोठ्या यंत्राच्या साह्याने डोंगर पोखरून बोगदा तयार करण्याचे काम व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मातीचा भराव व भिंत घालण्याचे काम आजही राजरोसपणे सुरू आहे. हे काम वन विभागाचे अधिकारी व शासकीय यंत्रणेचा आशीर्वाद असल्याशिवाय सुरू असणार नाही हे बेकायदेशीर काम बंद करण्यासाठी केवळ कागदोपत्री आदेश आहे. पण काम बंद पाडण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी वा वन विभागाचा अधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही किंवा बंदीची कारवाई केलेली नाही. हा प्रकल्प सह्याद्रीच्या इको सेन्सिटिव्ह झोन परिसरात सुरू आहे राजरोसपणे हजारो यंत्रे डोंगर फोडण्याचे काम करत आहेत हे सर्व काम वन खात्याच्या नियमानुसार बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे असे असून सुद्धा हे काम प्रत्यक्ष बंद पाडण्याचे किंवा कायमस्वरूपी थांबवण्याचे धाडस वनविभाग किंवा शासकीय यंत्रणेकडून केले जात नाही. तारळी धरणाच्या पाण्यामध्येच अदानी पंप हाऊस साठी बंधारा बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. येथे दिवसा सुद्धा यंत्रसामुग्री व कामगार काम करताना दिसत आहेत. सावरघर हे गाव पर्यावरण मंजुरी मध्ये येत नाही. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर हजारो डंपर माती व डबर उत्खनन करून तिथले संपूर्ण जंगल उध्वस्त करून ती माती तारळी धरणातील जलाशयात बंधारा उभारणीसाठी टाकलेली आहे. त्यामुळे पाणीसाठाही कमी होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *