Headlines

वनोजा बागेतील सोलर प्लांटला आग; कोट्यवधींचे नुकसान:आगीचे कारण अज्ञात, पोलिस तपास सुरू




अंजनगाव सुर्जी परिसरातील वनोजा बाग येथील सोलर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात सोलर प्लेट्स जळून खाक झाल्या असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या दीड वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मजुरांनी सुरुवातीला आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने ती नियंत्रणाबाहेर गेली. फायबर, ॲल्युमिनियम, कॉपर, काच आणि सिल्व्हरचा समावेश असलेल्या सोलर प्लेट्स वायुवेगाने पेटल्या. घटनेची माहिती मिळताच अंजनगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. रहिमापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंत वडतकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बंडोडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे असिस्टंट मॅनेजर दत्ता जगताप आणि साईट इंजिनिअर विनोद चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बॉक्समध्ये ३५ प्लेट्स असतात आणि प्रत्येक प्लेटची किंमत सुमारे १० हजार रुपये आहे. या आगीत एकूण ३५ बॉक्स जळून खाक झाले असून, यामुळे १ कोटी २२ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आगीचे कारण पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *