![]()
मुंबईतील बेस्ट बस अपघातांचे सत्र सुरूच असून, सोमवारी (7 सप्टेंबर) वरळी परिसरात झालेल्या भीषण अपघातात 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. वनमाला आर. साबळे असे मृत महिलेचे नाव आहे. वरळी एसटी ऑफिस सिग्नलजवळ सकाळी सुमारे 11.25 वाजता हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. अपघातप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल डेपोची बेस्ट बस सोमवारी सकाळी भायखळा स्थानकाच्या दिशेने येऊन लोटसच्या दिशेने जात होती. वरळी एसटी ऑफिस सिग्नलजवळ लाल सिग्नल असल्याने बस थांबली होती. त्याचवेळी बसच्या अगदी शेजारी एक टॅक्सी येऊन थांबली होती. वनमाला साबळे या टॅक्सीतून प्रवास करत होत्या. नेमकं घडलं काय? सिग्नल लाल असल्याने टॅक्सी थांबलेली असताना वनमाला साबळे या टॅक्सीतून बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडत होत्या. त्याचवेळी सिग्नल हिरवा झाला. सिग्नल हिरवा होताच बस पुढे निघाली. बस पुढे सरकत असताना वनमाला साबळे या बसच्या मागील बाजूच्या चाकाच्या जवळ आल्या आणि त्या चाकाखाली सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात वनमाला साबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच बसच्या कंडक्टरने जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी नायर रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, बस मुंबई सेंट्रल डेपोच्या ‘वेट-लीज’ पद्धतीवरील कंत्राटी चालकाकडून चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. बस चालकाने बस पुढे नेताना आजूबाजूच्या परिस्थितीची योग्य दक्षता घेतली का, तसेच सिग्नल हिरवा झाल्यानंतर बस सुरू करण्यापूर्वी शेजारील टॅक्सी आणि तिच्यातून उतरणाऱ्या प्रवाशाची स्थिती चालकाच्या लक्षात आली होती का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट बसच्या अपघातांच्या गंभीर घटना समोर येत आहेत. विशेषतः भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ‘वेट-लीज’ बसेस आणि त्यांच्या चालकांच्या कार्यपद्धतीवर या घटनांनंतर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बसचालकांची दक्षता, प्रशिक्षण, वाहतूक नियमांचे पालन आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वरळीतील या अपघातानंतर बेस्ट प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून चालकांच्या सुरक्षाविषयक नियमांचे पालन कितपत केले जाते, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, वनमाला साबळे यांच्या मृत्यूला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, तपासाअंती अपघाताची संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. हेही वाचा.. MPSC पेपरफुटी:’…तर एक क्षणही पदावर राहणार नाही’, आरोपांनंतर MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे थेट आव्हान नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच एमपीएससीच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर राज्यात विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. आज पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मोर्चा काढला. सरकारसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर देखील आरोप करण्यात आले. त्यावर आता भीमनवार यांनी निवेदन देत त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत.सविस्तर वाचा..
Source link
वरळीत बेस्ट बसच्या धडकेत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू:लाल सिग्नलवर थांबलेल्या बसशेजारी टॅक्सी आली अन् काही क्षणांतच घडला भीषण अपघात