Headlines

दहीहंडीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर पुणे पोलिसांची कारवाई:116 प्रकरणांत खटले दाखल होणार, 10 गुन्हे बीएनएस अंतर्गत नोंदवले




दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात पुणे पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. शहरातील सातही पोलिस परिमंडळांत नोंदविण्यात आलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या उल्लंघनांपैकी तब्बल 116 प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्या मंडळांना आणि डीजेचालकांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे. दहीहंडी उत्सवापूर्वी पुणे पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंडळांच्या आयोजकांना केले होते. तसेच निर्धारित ध्वनिमर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर दहीहंडी उत्सवादरम्यान पोलिसांनी शहर आणि उपनगरातील मंडळांवर विशेष लक्ष ठेवले. 1100 दहीहंडी मंडळांच्या ध्वनियंत्रणांची तपासणी पुणे पोलिसांनी शहर आणि उपनगरातील सुमारे 1100 दहीहंडी मंडळांच्या ध्वनियंत्रणांची तपासणी केली होती. यावेळी आवाजाच्या पातळीची नोंद करण्यात आली. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या मंडळांची माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात पुराव्यांच्या आधारे कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी यंदा कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. परिमंडळ एकमध्ये सर्वाधिक कारवाई पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, परिमंडळ एकमध्ये सर्वाधिक 55 प्रकरणांमध्ये न्यायालयात खटला भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याखालोखाल परिमंडळ सहामध्ये 27 आणि परिमंडळ दोनमध्ये 23 प्रकरणांचा समावेश आहे. परिमंडळ सातमध्ये 11 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात येत आहे. परिमंडळ तीन, चार आणि पाचमध्ये सध्या न्यायालयात खटला भरण्याची प्रकरणे नोंदविण्यात आलेली नाहीत. मात्र, बीएनएसअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या दहा गुन्ह्यांमध्ये परिमंडळ एक आणि दोनमध्ये प्रत्येकी एक, तर परिमंडळ तीनमध्ये आठ गुन्ह्यांचा समावेश आहे. ध्वनियंत्रणाही जप्त कारवाईदरम्यान पोलिसांनी काही ध्वनियंत्रणाही जप्त केल्या आहेत. यात तीन मिक्सर आणि सहा बेस स्पीकरसह ध्वनियंत्रणाचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांविरोधात केवळ नोटीस देऊन कारवाई थांबविण्याऐवजी पुराव्यांच्या आधारे थेट कायदेशीर पावले उचलण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. गणेशोत्सवातही नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दहीहंडी उत्सवानंतर आता पुण्यात गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा मंडळे, डीजेचालक आणि आयोजकांना इशारा दिला आहे. ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून न्यायालयीन कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. उत्सव साजरा करताना नागरिकांच्या शांततेचा आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचा विचार करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेही वाचा.. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय:मराठा विद्यार्थ्यांसाठी 4 महत्त्वाचे GR; OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती; मृतांच्या वारसांना नोकरी मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना राज्य सरकारच्या पातळीवर महत्त्वाच्या हालचालींना वेग आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा, कुणबी आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी चार महत्त्वाचे शासकीय आदेश जारी केले आहेत.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *