Headlines

मध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे आणि संवाद महत्त्वाचा:प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांचे प्रतिपादन




न्यायप्रक्रियेकडे केवळ जय-पराजयाच्या दृष्टिकोनातून न पाहता पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भावना जाणून घेऊन संवादातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू ए. एस. शेंडे यांनी म्हटले. मध्यस्थी प्रक्रियेत संवाद, समजूतदारपणा आणि प्रेमळपणाला विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील अशोका हॉलमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि पुणे बार असोसिएशनने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळूराम बबन भुजबळ उपस्थित होते. शेंडे यांनी सांगितले की, मध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे आणि त्यांच्या भावनांचा विचार करून संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. मध्यस्थीसाठी संभाषण कौशल्य आणि संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. मध्यस्थाने स्वतः निर्णायक भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हाडे यांनी मध्यस्थी प्रक्रियेची कार्यपद्धती, मध्यस्थाची भूमिका आणि त्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती आर. देशपांडे यांनी मध्यस्थी प्रक्रिया राबवताना येणाऱ्या अडचणी आणि त्या दूर करण्याच्या उपायांवर मार्गदर्शन केले. 12 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळूराम बबन भुजबळ यांनी सर्व वकिलांना मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी होऊन पक्षकारांना लवकर आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *