![]()
पत्नीला सासरी पाठविले जात नसल्याच्या कारणावरून एका 40 वर्षीय मूकबधिर पतीने चक्क मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. पत्नीसमवेत असलेले बॅनर टॉवरवर झळकवत त्याने तब्बल चार तास ठिय्या दिला. अखेर पत्नीने टॉवरजवळ येऊन व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी
.
लोहा शहरातील हळदव परिसरातील अफिया गफार घोडके हिचा एप्रिल 2024 मध्ये मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील शादुल मकदुम दौलताबादी याच्याशी रितीरिवाजानुसार विवाह झाला. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही मूकबधिर असून, हे दाम्पत्य तेलंगणा राज्यात मजुरीचे काम करते.
पत्नी माहेरी आल्यानंतर सासरची मंडळी तिला नांदण्यासाठी पाठवत नसल्याचा आरोप शादुल याने केला आहे. यापूर्वीही त्याने सुमारे आठ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले होते.
सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास शादुल लोहा बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मोबाईल टॉवरवर चढला. त्याने पत्नीसमवेत असलेले बॅनर टॉवरवर झळकावून चार तास ठिय्या दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सासरच्या मंडळींना निरोप देऊन पत्नीला घटनास्थळी बोलावले. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे दोघांचा संवाद घडवून आणण्यात आला.
अखेर दिलजमाई झाल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास शादुल टॉवरवरून खाली उतरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांना पाचारण केले. दरम्यान, या घटनेमुळे लोहा बसस्थानक परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. उशिरापर्यंत दौलताबादी आणि घोडके कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू होती.